‘नवा शुक्रतारा’च्या १०० व्या कार्यक्रमाला रसिकांचा मोठा प्रतिसाद
१०० व्या कार्यक्रमानिमित्त गायक, संगीतकार मंदार आपटे यांचा विशेष सत्कार
पुणे दि. ७ एप्रिल, २०२५ : १९६३ साली शुक्रतारा हे गाणे लिहिले गेले असेल, त्या काळी आमचा जन्मही झाला नव्हता, त्या काळची तरुण पिढी अरुण दातेंची भावगीते ऐकायची, त्यामध्ये रमायची. आम्ही तरुण वयात असताना त्या भावविश्वात आम्हीही रंगलो आता आमची मुले तारुण्यात येत असताना अरुण दाते यांच्या गीतांमधील गोडवा आजही कायम आहे. त्यामुळे अरुण दातेंमुळे तीन पिढ्या या भावगीतांच्या विश्वात रमल्या, अशा भावना खासदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केल्या. ‘शुक्रतारा’, ‘लाजून ते हसणे…’, ‘झोपाळ्या वाचून झुलायचे…’, ‘या जन्मावर…’ अशी कित्येक गाणी आजही रसिकांच्या मनावर गारुड घालत अरुण दाते यांच्या आठवणी जाग्या करतात, असेही त्यांनी नमूद केले.
स्व. अरुण दाते यांच्या सुमधुर गीतांच्या ‘नवा शुक्रतारा’ च्या १०० व्या कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुण्या म्हणून मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या, त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माणिक निर्मित, अतुल अरुण दाते प्रस्तुत आणि मॅजिस्टिक्स लँडमार्क्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला ‘नवा शुक्रतारा’ हा कार्यक्रम आज कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न झाला. अतुल अरुण दाते, मॅजिस्टिक्स लँडमार्क्सच्या प्रीती पानसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. १०० व्या ‘नवा शुक्रतारा’ निमित्त आज गायक, संगीतकार मंदार आपटे यांचा विशेष सत्कार देखील करण्यात आला.
यावेळी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “शुक्रतारा हा कार्यक्रम लोकप्रिय ठरतो कारण त्यातील गाणी पुन्हा पुन्हा ऐकण्याची मागणी ही रसिकांची आहे. यामध्ये गाण्यांच्या चालींचे. पाडगांवकरांच्या गीतांचे आणि अरुण दाते यांच्या आवाजाचे महात्म्य आहे, असे मला वाटते. आज आपण यु ट्यूबवर अनेकदा गाणी ऐकतो, अगदी पुन्हा पुन्हा ऐकतो. पण, ती मजा येत नाही. अशा कार्यक्रमांमधील मजा इथेच लाईव्ह ऐकण्यात आहे. कार्यक्रमामध्ये आपण गायक, कलाकारांचे सादरीकरण पाहतो, दाद देतो, वन्स मोर देतो, कार्यक्रमाची खऱ्या अर्थाने मित्र मंडळी, कुटुंबियांसोबत मजा घेतो. त्यामुळे असे कार्यक्रम हे होत रहायला हवे असे मला वाटते.”
अरुण दाते मला मुलगी मानायचे. त्यांच्या आवाजात जेवढा गोडवा होता तेवढाच गोडवा त्यांच्या स्वभावातही होता. त्यांचे वागणे देखील खूप छान असायचे. आज नवा शुक्रताराचे प्रयोग पाहताना अरुण दाते यांच्या आवाजाची, गाण्याच्या गोडव्याची प्रचीती येते, असेही कुलकर्णी यांनी नमूद केले.
बाबांनी शुक्रताराचे तब्बल पावणे तीन हजार कार्यक्रम केले. ‘नवा शुक्रतारा’ हा त्यांच्या याच कार्यक्रमांपुढील १०० कार्यक्रमांचा भाग आहे असे मी मानतो. ‘नवा शुक्रतारा’चा पहिला प्रयोग पुण्यात झाला, १०० वा प्रयोगही पुण्यात होतोय आणि २०० वा प्रयोगही आपण पुण्यातच करू असा विश्वास यावेळी अतुल अरुण दाते यांनी व्यक्त केला.
मी भावगीत गायकाचा मुलगा असलो, तरी सर्व प्रकारचे संगीत ऐकतो. फक्त भावगीतच ऐकले पाहिजे असे कधीच मनात आले नाही. मी पाकिस्तानी कलाकारांची गाणीही ऐकली आहेत. मात्र मराठी भावसंगीत टिकावे म्हणून काम करायचे असे मी ठरविले होते, त्यामुळे याच क्षेत्रात कार्यरत आहे, असेही दाते यांनी नमूद केले.
अरुण दाते जरी हिंदू होते तरी त्यांनी गायकीमध्ये कधीच धर्म आणला नाही. ते मेहेंदी हसन आणि मायकल जॅक्सन दोघांचे ही संगीत ऐकायचे अशी आठवण अतुल दाते यांनी सांगितली.
२०१६ पासून ‘नवा शुक्रतारा सुरु झाला तेव्हापासून मी त्याचा भाग आहे. कार्यक्रमांच्या गर्दीत आपला स्वत:चा एक वेगळा कार्यक्रम असावा याचे समाधान मला या कार्यक्रमाने दिले. माझा हा ८५ वा सोलो शुक्रतारा कार्यक्रम असल्याचा मला आनंद आहे असे सांगत मंदार आपटे म्हणाले, “९९ व्या कार्यक्रमावेळी मी अंतर्मुख होतो, आपण कुठे बसलो आहोत, इथे बसण्याची आपली पात्रता आहे का? हे विचार सातत्याने माझ्या मनात येत होते. १९९६ साली कोल्हापूर ला असताना एका प्रेक्षकाने तिकीट रद्द केले म्हणून अरुण दाते यांच्या शुक्रताराचा कार्यक्रम मी मागच्या रांगेत बसून पाहिला होता. आज मी दाते कुटुंबातील एक भाग आहे हे माझे भाग्य आहे, असे मी समजतो.”
‘नवा शुक्रतारा’ हा कार्यक्रम करताना माझ्या आवाजात प्रेक्षकांनी अरुण दातेंचा आवाज शोधू नये असे मी कायम सांगतो, आपण शुक्रतारा नाही आपण केवळ या कार्यक्रमाद्वारे त्यातली गाणी लोकांसमोर नेत आहोत याची मला जाणीव आहे. अरुण दाते यांचा आवाज एकमेव आहे, अरुण दाते हेच एकमेव ‘शुक्रतारा’ आहेत असे मंदार आपटे म्हणाले. मी फक्त अरुण दाते यांनी गायलेली उत्तम गाणी, उत्तम शब्द, उत्तम संगीत हे रसिकांसमोर सादर करतो कारण संगीत हा माझा आनंद आहे. संगीत हे व्यावसायिकतेपेक्षा जास्त माझ्यासाठी आनंददायी गोष्ट आहे असेही आपटे यांनी नमूद केले.
‘नवा शुक्रतारा’च्या १०० व्या कार्यक्रमानिमित्त सहभागी कलाकारांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये गायिका पल्लवी पारगांवकर, वर्षा जोशी यांसोबतच प्रसन्ना बाम, अमित कुंटे, अभय इंगळे, प्रणव हरिदास, झंकार कानडे, अमेय ठाकुरदेसाई, प्रशांत कांबळे, सायली सोनटक्के, शुभंकर कुलकर्णी, तुषार जोशी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम जय राम जय जय राम या अरुण दाते यांनी गायलेल्या एकमेव भजनाने झाली. यानंतर ‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला…’, ‘सखी शेजारिणी तू हसत रहा…’, ‘असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे…’, ‘दिवस तुझे हे फुलायचे.. झोपाळ्यावाचून झुलायचे…’ ही गीते सादर झाली. कार्यक्रमाची संकल्पना अतुल अरुण दाते यांची होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रीती जोशी यांनी केले.

