सद्गुरु श्री जंगली महाराज पुण्यतिथी महोत्सवात कलापिनी कोमकली यांचे सुश्राव्य गायन
पुणे: सुस्वर स्वर, शास्त्रीय संगीतातील विविध रागांमधील बंदिशींचे चपखल सादरीकरण आणि रसिकांची मनमुराद दाद, अशा भारावलेल्या वातावरणात ज्येष्ठ शास्त्रीय गायिका विदुषी कलापिनी कोमकली यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम पार पडला.
सद्गुरु जंगली महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३५ व्या पुण्यतिथी महोत्सवात विदुषी कलापिनी कोमकली यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम झाला. यामध्ये त्यांनी शास्त्रीय संगीत व भजन सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
प्रशांत पांडव (तबला), स्वानंद कुलकर्णी (संवादिनी), आणि राजगोपाल गोसावी (पखवाज) यांनी कलापिनी कोमकली यांना सुमधुर साथ संगत केली. ट्रस्टचे राजेंद्र तांबेकर यांच्या हस्ते कलापिनी कोमकली यांचे स्वागत करण्यात आले.
विदुषी कलापिनी कोमकली यांनी त्यांच्या वडिलांनी आणि गुरूंनी पंडित कुमार गंधर्व यांनी रचलेल्या ‘देवो दान मोहे’ या राग कल्याणमधील बंदिशीने मैफिलीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी बडा खयाल आणि धृत रचनांनी मैफल रंगवत नेली. रसिकांनी त्यांच्या गायनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मैफिलीचा मनमुराद आनंद घेतला.
कलापिनी कोमकली म्हणाल्या, मी माझ्या गायनाचे अनेक ठिकाणी सादरीकरण केले आहे, परंतु प्रत्यक्ष सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या समाधीसमोर गायन करण्याची संधी मला मिळत आहे, याबद्दल मी आभारी आहे. एक प्रकारे मी देवाच्या दरबारातच माझे सादरीकरण करत आहे.

