पुणे- महापालिकेचे आरोग्य खाते झोपले आहे काय ? असा ठणठणीत सवाल केल्यावर महापालिकेच्या झोपी गेलेल्या आरोग्य प्रमुख अखेरीस जाग्या झाल्या आणि शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांना नोटीस बजावून उपचारापूर्वी डिपॉझिट घेण्यास सक्त मनाई केली आहे. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णावर प्रथम उपचार करा त्यानंतर त्यांच्याकडे पैसे मागा, असे या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.
तनिषा भिसे नामक गरोदर महिलेला दीनानाथ रुग्णालयात गंभीर स्थितीत प्रसूतीसाठी आणण्यात आले होते. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना 10 लाखांचे डिपॉझिट भरल्यानंतरच दाखल करून घेण्याची भूमिका घेतली होती. परिणामी, उपचारास विलंब झाल्यामुळे तनिषा यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून दीनानाथ रुग्णालयावर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने सर्वच खासगी रुग्णालयांना नोटीस बजावली आहे.
महापालिकेने आपल्या नोटीसीत सर्वच खासगी रुग्णालयांना रुग्णांकडून उपचारापूर्वी डिपॉझिट न घेण्यास बंदी घातली आहे. तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून कोणतीही अनामत रक्कम घेतली जाऊ नये. सर्वप्रथम रुग्णावर उपचार करण्यास प्राधान्य दिले जावे, असे निर्देश मनपाने आपल्या तातडीच्या नोटीसीद्वारे दिलेत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे इमर्जन्सी स्थितीत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, पुणे पोलिसांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात वैद्यकीय दुर्लक्षीपणा आढळला तर गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिलेत. या प्रकरणी पोलिसांनी ससूनच्या अधीक्षकांना पत्र लिहून स्पष्टीकरण मागितले आहे. यासंबंधीच्या सरकारी अहवालात तनिषा भिसे यांना रुग्णालयात गंभीर स्थितीत तब्बल साडेपाच तास बसवून ठेवल्याची बाब समोर आली आहे. ही वैद्यकीय नेगलिजन्सची बाब आहे. यामुळे उपचारास विलंब झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे आपल्या पत्रासोबत जोडल्याची माहिती आहे.

