पुणे : शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर आकर्षक परताव्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची एक कोटी ६० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी सहा जणांना अटक केली. पुणे सायबर पोलिसांनी देशपातळीवरील फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले असून, आरोपींचे दुबई, गुजरात आणि पश्चिम बंगाल कनेक्शन असल्याचे समोर आले आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे अनन्या गुप्ता नावाच्या महिलेने संपर्क केला. तिने शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळेल, असे सांगून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एक कोटी ६० लाख रुपये जमा करण्यास प्रवृत्त करून फसवणूक केली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान १७ मार्च रोजी वाघोलीतील एका बँकेच्या खात्यातून पाच लाख ८२ हजारांची रक्कम धनादेशाद्वारे काढल्याचे निष्पन्न झाले. यावरून खराडीतील केतन भिवरे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तांत्रिक तपासातून इतर आरोपींची नावे समोर आली. गोविंद सूर्यवंशी (रा. वाघोली, मूळ रा. हिंगोली), रोहित कंबोज (रा. वाघोली, मूळ रा. पंजाब), ओंकार भवर (रा. वाघोली, मूळ रा. हिंगोली), जब्बरसिंह पुरोहित (रा. चऱ्होली, मूळ रा. धारावी), निखिल ऊर्फ किशोर सातव (रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने आरोपींना १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.यातील सूर्यवंशी आणि कंबोज बी.टेक पदवीधर असून, डिजिटल मार्केटिंग आणि क्रिप्टोकरन्सी व्यवहारात सक्रिय आहेत. सूर्यवंशी हा वाघोलीतील विघ्नेश्वर मल्टीस्टेट को.ऑप बँकेचा संचालक आहे. कंबोज बँकेतील तांत्रिक कामे बघत होता. सातव हा बनावट बँक खाती पुरवठा करीत होता.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलिस उपनिरीक्षक संदीप कदम, तुषार भोसले, संदीप पवार, दिनेश मरकड आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.या टोळीने दीडशे बँक खाती वापरून सायबर गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. नॅशनल सायबर पोर्टलवर विविध राज्यांत २९ तक्रारी दाखल असून, त्यात या टोळीचा हात असल्याचे सायबर पोलिसांनी उघड केले आहे.