महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये वीजहानीत घट
पुणे, दि. ०७ एप्रिल २०२५: गेल्या दोन वर्षांत महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये वीजबिलांचे अचूक बिलिंग, विविध उपायायोजनांनी वीजहानीमध्ये घट आणि विक्रमी ४ लाख ३४ हजार नवीन वीजजोडण्यांमुळे वार्षिक महसूलात ५ हजार १३७ कोटी ५५ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. सोबतच चालू वीजबिल वसूलीची वार्षिक कार्यक्षमता १०० टक्क्यांवर नेली आहे. या कामगिरीसोबतच पुणे परिमंडलाने छतावरील सौर प्रकल्पांना गती देत राज्यात सर्वाधिक ४७४ मेगावॅटची स्थापित क्षमता निर्माण केली आहे.
रास्तापेठ येथील ‘प्रकाशदूत’ सभागृहामध्ये पुणे परिमंडलाची वार्षिक आढावा बैठक नुकतीच झाली. तीत मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी ग्राहकसेवेसह विविध कामांचा मागील तीन आर्थिक वर्षांचा तुलनात्मक आढावा घेतला. यावेळी अधीक्षक अभियंता सर्वश्री युवराज जरग, सिंहाजीराव गायकवाड, रवींद्र बुंदेले, संजीव नेहेते, अनिल घोगरे, सहायक महाव्यवस्थापक माधुरी राऊत (वित्त व लेखा) व शीतल निकम (प्रभारी, मानव संसाधन) यांची प्रमुख उपस्थिती होती.
गेल्या दोन वर्षांपासून पुणे परिमंडलामध्ये १०० टक्के अचूक बिलिंगचे लक्ष्य समोर ठेऊन विशेष प्रयत्न व उपाययोजनांना गती देण्यात आली आहे. यामध्ये मुख्य अभियंता श्री. पवार यांच्याकडून मीटर रीडिंग एजन्सी आणि सर्व कार्यकारी अभियंता, लेखा अधिकाऱ्यांची द्वैमासिक संयुक्त आढावा बैठक घेण्यात येत आहे. त्यामुळे अचूक बिलिंगचे प्रमाण ०.७३ टक्क्यांनी वाढले आहे. तर सरासरी वीजबिलांच्या प्रमाणात ०.९३ टक्क्यांनी घट झाली आहे. यासोबतच पुणे परिमंडलामध्ये गेल्या दोन वर्षांत तब्बल ४ लाख ३४ हजार ८३६ विक्रमी नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. सध्या सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांची संख्या ३९ लाख १७ हजार ७०१ झाली असून राज्यात सर्वाधिक आहे. तसेच वीजबिल वसूलीची कार्यक्षमता वाढवून प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांकडील १२४ कोटींची थकबाकी सन २०२४-२५ अखेर ६९ कोटींवर आणली आहे. तर गेल्या दोन वर्षांत ६२ कोटी ४० लाख रुपयांच्या वीजचोरींचा पर्दापाश करण्यात आला आहे.
या सर्व कामगिरीची फलनिष्पत्ती म्हणजे गेल्या दोन वर्षांत वितरण हानीमध्ये ०.३६ टक्के, लघुदाब वीजहानीत ०.९६ टक्के तसेच तांत्रिक व वाणिज्यिक हानीमध्ये ०.३२ टक्के घट झाली आहे. सद्यस्थितीत पुणे परिमंडलाच्या तांत्रिक व वाणिज्यिक हानीचे प्रमाण ७.६९ टक्के आहे. परिणामी महावितरणच्या पुणे परिमंडलाचा वार्षिक महसूल २१ हजार २८० कोटी रुपयांवर गेला असून दोन वर्षांमध्ये त्यात तब्बल ५ हजार १३७ कोटी ५५ लाख रुपयांनी वाढ झाली आहे.
यासह पुणे परिमंडलाने सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये भरारी घेतली आहे. दोन वर्षांपूर्वी एकूण ९ हजार ९७७ ग्राहकांकडे छतावरील सौर प्रकल्पांची क्षमता २४९ मेगावॅट होती. यंदा मार्चअखेर २८ हजार ६०४ ग्राहकांकडे ही क्षमता राज्यात सर्वाधिक ४७४ मेगावॅट झाली आहे. राज्यात छतावरील सौर ऊर्जेच्या स्थापित क्षमतेत पुणे परिमंडलाचा सर्वाधिक १५ टक्के वाटा आहे, हे विशेष.
मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, महावितरणचा आर्थिक डोलारा वीजबिलांच्या वसूलीवरच आहे. ‘दर्जेदार व तत्पर ग्राहकसेवा’, ‘महसूलवाढ’ आणि ‘वीजबिलांची शून्य थकबाकी’ या त्रिसूत्रीचे उद्दिष्ट घेऊन गेल्या दोन वर्षांत काम करण्यात आले. त्यास सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पुणे परिमंडलाची ही आगेकूच झाली आहे. मात्र वीजक्षेत्रात काल केलेल्या कामगिरीवर आज तगू शकत नाही. त्यामुळे या त्रिसूत्रीनुसार पुढेही दैनंदिन कामकाज गतिमान करण्याची सूचना मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी यावेळी केली.