मुंबई-बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटर प्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे. या प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत. अक्षय शिंदेच्या वडिलांनी पोलिसांवर आरोप करत याचिका दाखल केली होती. त्यावर हायकोर्टाने निकाल देताना हे आदेश दिले आहेत.
अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटर प्रकरणी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीत आज मुंबई हायकोर्टाने आदेश जारी केले आहेत.मुंबई गुन्हे शाखेचे लखमी गौतम यांच्या नेतृत्वात हा तपास केला जाणार आहे.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणातील ज्या पोलिसांवर आरोप होते, त्या पोलिस अधिकाऱ्यांवर मॅजिस्ट्रेट कोर्टाने एक अहवाल तयार केला होता. त्यात पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला होता. राज्य सरकारने त्यातील एका विशिष्ट भागाला आव्हान दिले होते. मात्र, ते सुद्धा फेटाळून लावण्यात आले आहे. या प्रकरणातील पाच पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि गोखले यांच्या खंडपीठाने हे आदेश जारी केले आहेत.
मुंबई पोलिस सहआयुक्त गुन्हे यांना या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अक्षय शिंदेचे वडील अण्णा शिंदे यांनी पोलिसांवर कारवाईची मागणी करत याचिका दाखल केली होती. या घटनेबाबत दंडाधिकारी कोर्टाने पोलिसांच्या कारवाईवर ठपका ठेवला होता. यावर विरोधकांनीही राज्य सरकारवर टीकेची झोड उडवली होती.