पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी पीडित भिसे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झालेला नसून तिची हत्या झाली आहे, असे म्हटले आहे. या प्रकरणात सरकारने काहीतरी संवेदनशीलपणा दाखवत कारवाई केली पाहिजे. एका समितीचा अहवाल आला आहे. सरकार आणखी दहा समित्यांचा अहवाल घेणार का? असा संताप व्यक्त केला.पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि तनिषा भिसे मृत्यू प्रकरण राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर चौफेर टीकेची झोड उठली आहे. याच दरम्यान, डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डॉक्टर घैसास यांच्या राजीनाम्यामुळे कोणताही प्रश्न सुटत नसल्याचा दावा सुप्रिया यांनी केला.
तनिषा भिसे यांचा मृत्यू झालेला नसून त्यांची हत्या करण्यात आली आहे. डॉ. घैसास यांनी राजीनामा दिला म्हणजे काय झाले? आम्हाला राजीनामा नकोय. आम्हाला सरकारकडून तातडीने कारवाई हवी आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. या मृत्यू प्रकरणाचा अहवाल आलेला आहे. या अहवालातून रुग्णालय प्रशासनाची चूक आहे, हे दिसत आहे. त्यामुळेच या प्रकरणात समावेश असलेल्या सर्वावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एका समितीचा अहवाल आला आहे. सरकार आणखी दहा समित्यांचा अहवाल घेणार का? असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
मृत महिलेने ज्या मुलींना जन्म दिलाय, त्या मुलींची प्रकृती चिंताजनक आहे. त्या मुलींवर आयसीयूमध्ये उपचार चालू आहे. त्या महिलेचे कुटुंब वेगळ्या दु:खातून जात आहे. त्यामुळे सरकारने संवेदनशीलता दाखवावी. त्या मुलीची जी हत्या झाली, तसा दिवस महाराष्ट्रातील कुठल्याही लेकीवर येऊ नये त्यासाठी मी इथे आली आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही तसेच इतर गोष्टी पारदर्शकपणे संपूर्ण महाराष्ट्राला समजल्या पाहिजेत. त्या दिवशी नेमके काय झाले, ते समोर आले पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
या प्रकरणात समाविष्ट असलेले डॉक्टर, तसेच महिलेच्या हत्येत जे लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे समाविष्ट आहेत, त्या सर्वांनाच शिक्षा झाली पाहिजे. विशेष म्हणजे ही कारवाई एका निश्चित काळात झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. शरद पवार मुख्यमंत्री असताना व श्रीनिवास पाटील कलेक्टर असताना रुग्णालयाल ही जागा दिली गेली. या साठी लता दीदींनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नांमुळे रुग्णालयाला ही जमीन देण्यात आली. त्यामुळे हा दवाखाना उभा राहिला. मात्र, या रुग्णालयात गेलेल्या अनेक नागरिकांनी दवाखान्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल तक्रारी केल्या होत्या. धर्मादाय दवाखाना असल्यामुळे सगळ्यांनी मदतीची भुमिका घेतली. मात्र. घडलेली घटना दुर्दैवी आहे. या दवाखान्याला मंगेशकर कुटुंबियांचे मोठे नाव आहे. मात्र, या प्रकरणात मंगेशकर कुटुंबाची काही चुक नाही, कारण ते त्या हॉस्पिटलच्या प्रशासनात नसून ते केवळ ट्रस्टी आहेत. त्यामुळे आपण त्यांनाही ही घटना गंभीरतेने घेऊन या प्रकरणी कारवाई करण्याची विनंती करू. दीनानाथ मंगेशकरांचं यांच नाव असलेल्या या दवाखान्यात घडलेली ही घटना धक्कादायक आहे, मंगेशकर कुटुंबाचं या देशात मोठं योगदान आह, असे सुळे म्हणाल्या.