तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सापडले होते वादात; प्रसूतीसाठी 10 लाख डिपॉझिट मागितल्याचा ठपका
पुणे- येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वादग्रस्त डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते तनिषा भिसे मृत्यूप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्यावर टीकेची चौफेर झोड उठत होती. अखेर या प्रकरणी राज्य सरकारच्या समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
तनिषा भिसे नामक गरोदर महिलेला दीनानाथ रुग्णालयात गंभीर स्थितीत प्रसूतीसाठी आणण्यात आले होते. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना 10 लाखांचे डिपॉझिट भरल्यानंतरच दाखल करून घेण्याची भूमिका घेतली होती. यासंबंधीच्या रिसिप्टवर डॉक्टर सुश्रुत घैसास यांची स्वाक्षरी होती. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली होती. या प्रकरणी सत्ताधारी महायुतीसह विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या सर्वच घटकपक्षांनी दीनानाथ रुग्णालयाबाहेर निदर्शने केली होती. त्यानंतर सरकारनेही या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करून जनतेचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला. या समितीचा सोमवारी अहवाल आला. त्यानंतर काही तासांतच डॉक्टर घैसास यांनी दीनानाथ रुग्णालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला.
डॉक्टर सुश्रुत घैसास हे दीनानाथ रुग्णालयातील अत्यंत अनुभवी डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या विरोधात झालेले आरोप तथा त्यानंतर वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर निर्माण झालेला ताण-तणाव आणि रुग्णालयाच्या प्रतिमेला झालेली हानी लक्षात घेता त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे पसंत केले. ते आपल्या राजीनामा पत्रात म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणामुळे रुग्णालयाच्या नावलौकिकावर गालबोट लागत आहे. विशेषतः माझ्या उपस्थितीमुळे परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता असल्यामुळे मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे. रुग्णसेवा हे माझे सर्वोच्च कर्तव्य असून, त्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, हीच माझी भूमिका आहे.
तनिषा भिसे यांच्या मृत्यूचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. सत्ताधारी भाजप महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी डॉक्टर घैसास यांच्या नातेवाकांच्या पुण्यातील नवसह्याद्री सोसायटीतील एका हॉस्पिटलची तोडफोड केली होती. या प्रकरणी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांवर दंगलीच्या आरोपासह महाराष्ट्र मेडिकेअर सर्व्हिस पर्सन अँड मेडिकेअर सेवा संस्था (हिंसा प्रतिबंध आणि मालमत्तेचे नुकसान किंवा नुकसान) कायदा, 2010 च्या कलम 3 आणि 4 अंतर्गत अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉक्टर घैसास यांची कृती काळीमा फासणारी -आमदार अमित गोरखे
भाजप आमदार अमित गोरखे यांनीही घैसास यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, भिसे कुटुंबियांचे सुरुवातीपासून हेच म्हणणे होते की, या घटनेला डॉ. घैसास हेच जबाबदार आहेत. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत होते. ते पुढेही करत राहील. ज्या उदात्त भावनेने आमच्या सरकारने आणि मंगेशकर परिवाराने हे हॉस्पिटल चालू केले त्याला कुठेतरी काळीमा फासण्याचे काम डॉ. घैसास यांच्या कृतीने झाले. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आज त्यांनी राजीनामा दिला आहे. याचा अर्थ त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे. आत्ता एक अहवाल आला आहे. आणखी दोन अहवाल येतील. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया होईल.