ज्येष्ठ गिर्यारोहक तज्ज्ञ उमेश झिरपे : जंगली महाराज पुण्यतिथी महोत्सवात गिर्यारोहण आणि माउंट एव्हरेस्ट या विषयावर व्याख्यान
पुणे: केवळ भटकंती करणे म्हणजे पर्यटन, असा सर्वसामान्यांमध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे. भटकंती कोणीही करू शकतो, परंतु गिर्यारोहणासाठी ठराविक प्रशिक्षण आणि त्याचा सराव असणे गरजेचे असते. गिर्यारोहण हे आयुष्य जगण्यासाठी सकारात्मक ऊर्जा देते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी गिर्यारोहण करणे गरजेचे असून, त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे, असे मत ज्येष्ठ गिर्यारोहक तज्ज्ञ आणि ‘गिरीप्रेमी’ संस्थेचे प्रमुख उमेश झिरपे यांनी व्यक्त केले.
सद्गुरु श्री जंगली महाराज मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३५व्या पुण्यतिथी महोत्सवात उमेश झिरपे यांचे “एव्हरेस्ट आणि गिर्यारोहण” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तांबेकर यांच्या हस्ते उमेश झिरपे यांचा सत्कार करण्यात आला.
उमेश झिरपे म्हणाले, एव्हरेस्ट सर करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. परंतु प्रत्येक गिर्यारोहकाने एव्हरेस्ट सर केलेच पाहिजे, असे नाही. मात्र गिर्यारोहण करताना आयुष्यामध्ये जे सकारात्मक बदल आपल्याला अनुभवायला मिळतात, ते अनुभवण्यासाठी प्रत्येकाने गिर्यारोहण करणे गरजेचे आहे. आपल्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेनुसार आपण जर गिर्यारोहण केले, तर त्याचा उपयोग आपल्याला आरोग्य चांगले राहण्यासाठी होऊ शकतो.
शारीरिक आणि मानसिक क्षमतेमध्ये वाढ होणे, आपल्या क्षमतांची जाणीव होणे, तसेच संकटांना सहज तोंड देण्यासाठी प्रेरणा मिळणे, असे महत्त्वाचे बदल आपल्या आयुष्यात गिर्यारोहणाच्या माध्यमातून होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांनी आयुष्यामध्ये गिर्यारोहणाचा छंद जोपासला पाहिजे,असेही उमेश झिरपे यांनी यावेळी सांगितले.