पुणे : कसबा पेठेतील चव्हाण श्रीराम मंदिर येथे आज (दि.6) श्रीराम जन्मसोहळा पारंपरिक पद्धतीने, भक्तीभावाने आणि जनसेवा फाऊंडेशनच्या वृद्धाश्रमातील वृद्ध आणि अनाथाश्रमातील लहान मुलांसमवेत साजरा करण्यात आला. समाजभान जपत चव्हाण परिवारातर्फे दरवर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने रामजन्मोत्सवाचे आयोजन केले जाते.
या सोहळ्यानिमित्त सामाजिक जाणिवेच्या बांधिलकीतून नागरिकांची मोफत आरोग्य तपसाणी करण्यात आली. सामाजिक, शैक्षिणक, क्रीडा आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा श्रीराम सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अतुलनिय कामगिरी केल्याबद्दल डॉ. विनोद शहा यांचा विशेष सत्कार डॉ. मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी स्थापन केलेल्या जनसेवा फाऊंडेशनमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता चव्हाण परिवाराच्या वतीने 21 हजार रुपयांची मदत देण्यात आली. शाल आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
श्रीराम चव्हाण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष गणेश चव्हाण, बापू गायकवाड, दत्ता सागरे, डॉ. नितीन भालेराव, मारुतराव देशमुख, अप्पासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते भोला वांजळे आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय खो-खो संघाचे कर्णधार प्रतिक वाईकर, उपकर्णधार सुयश गरगटे, खो-खो खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल आदित्य गणपुले तसेच भारतीय खो-खो पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, भारतीय खो-खो महिला संघाच्या प्रशिक्षिका प्राची वाईकर यांचा श्रीराम सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला.
मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा 260 नागरिकांनी लाभ घेतला.
श्रीराम जन्मसोहळ्यानिमित्त विद्या यंदे यांनी कीर्तनसेवा सादर केली. त्यांना अशोक मोरे (तबला), प्रणव तळवलकर (संवादिनी), धनंजय साळुंके (तालवाद्य), डॉ. अनघा धायगुडे, कल्याण हुद्दार (सहगायन) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनघा धायगुडे यांनी केले.