पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी गाजावाजा केलेली स्मार्ट सिटी योजना बंद पडली असून या योजनेचे आमीष दाखवत भाजपने पुणेकरांना फसविले आहे, अशी टीका माजी आमदार, काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली आहे.
स्मार्ट सिटी योजना पुण्यासह सर्व शहरात अपयशी ठरत आहे, अशा बातम्या प्रसिद्ध होत होत्या. स्मार्ट सिटी योजना मोदी सरकार अचानक गुंडाळून टाकेल आणि पळ काढेल, असे मी दोन वर्षांपूर्वीच सांगितले होते आणि नेमके तेच घडले, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
देशातील शंभर शहरे स्मार्ट केली जातील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. स्मार्ट सिटी योजनेत २०१६ साली शंभर शहरांमध्ये पुण्याचा समावेश केला. पहिल्या टप्प्यासाठी बाणेर, बालेवाडी भागाची निवड करण्यात आली. मात्र विकसित असलेल्या या परिसरातही स्मार्ट सिटी योजना अपयशी ठरली. संपूर्ण शहर स्मार्ट करणे दूरच राहिले. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांमध्ये भाजपचे नेते आश्वासनं देत राहिले आणि पुणेकरांनी भाजपला मते दिली. प्रत्यक्षात मात्र पुणेकरांची फसगत झाली, पारदर्शी प्रशासन, अत्याधुनिक दळणवळण यंत्रणा, शैक्षणिक सुविधा, आधुनिक आरोग्य केंद्रे, कार्यक्षम पाणी पुरवठा, कचरा व्यवस्थापन, सुनियोजित गृहनिर्माण प्रकल्प अशी उद्दिष्टे स्मार्ट सिटी योजनेची सांगण्यात आली. मात्र, १० टक्केही सुधारणा झालेल्या नाहीत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
काँग्रेस आघाडी सरकारने पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली शहरांच्या विकासासाठी जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण मिशन (जेएनयूआरएम) हाती घेतले. या योजनेतून पुण्यात सुमारे ४ हजार कोटींची विकास कामे झाली. सत्तेवर येताच पंतप्रधान मोदी यांनी राजकीय हेतू डोळ्यांसमोर ठेऊन जेएनयूआरएम योजना रद्द केली आणि स्मार्ट सिटीचे ‘गाजर ‘ भारतीयांना दाखविले. या राजकारणात पुणे आणि महानगरे विकासकामांपासून वंचित राहिली. ही बाब संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत पुण्यात अकराशे कोटींचा खर्च झाला. यात भ्रष्टाचारच झालेला आहे. ४५ प्रकल्प पूर्ण झाले, असा दावा सरकारकडून केला जातो. त्याचा हिशेब आणि तपशील केंद्र सरकारने द्यावा आणि पुणेकरांसमोर वस्तूस्थिती मांडावी. जनतेनेही सरकारला जाब विचारावा, स्मार्ट सिटी योजनेबाबत मोदी सरकार दिशाभूल करीत आहे, याकडे काँग्रेसने सातत्याने लक्ष वेधले होते, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.