सरकारच्या समितीचा अहवाल सोमवारी येणार
पुणे-तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणी पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाने आपल्या अहवालात स्वतःला क्लिनचीट देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्या अहवालाला कोणतेही महत्त्व नाही, असे महत्त्वपूर्ण विधान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे दीनानाथ रुग्णालयाभोवतीचा कारवाईचा फास अधिकच घट्ट आवळला जाण्याची शक्यता आहे.
तनिषा भिसे यांना दीनानाथ रुग्णालयात गंभीर स्थितीत प्रसूतीसाठी आणण्यात आले होते. पण रुग्णालय प्रशासनाने त्यांना 10 लाखांचे डिपॉझिट भरल्यानंतरच दाखल करून घेण्याची भूमिका घेतली होती. परिणामी, उपचारास विलंब झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही घटना उजेडात आल्यानंतर या रुग्णालयावर चौफेर टीकेची झोड उठली असताना रुपाली चाकणकर यांनी वरील भूमिका घेतली आहे.रुपाली चाकणकर म्हणाल्या की, प्रस्तुत प्रकरणात पीडितेच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर चौकशी केली जाईल. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने यासंबंधी स्वतःचाच एक चौकशी अहवाल सादर केला आहे. पण त्याला फारसे महत्त्व व गांभीर्य नाही. कारण, हा स्वतःलाच क्लिनचीट देण्याचा प्रकार आहे. या प्रकरणी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ही समिती सोमवारी सकाळी पुणे पोलिस आयुक्तांना आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालातील माहितीनुसार पुढील कारवाई केली जाईल.