पुणे :आमदार अमित गोरखे तसेच दिनानाथ रुग्णालय प्रकरणातील मृत तनिशा भिसे हिच्या नातेवाईक यांनी आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहराज्य मंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले आणि तोंडी गाऱ्हाणी देखील मांडली ‘ईश्वरी (तनिषा) भिसे या गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील तज्ज्ञ समितीने दिलेला अहवाल खोटा आहे.रुग्णाला कर्करोग झाल्याचे रुग्णालयाच्या समितीने म्हटले आहे. हे पूर्णपणे खोटे आहे. रुग्णालयाच्या मुजोरीमुळेच हा मृत्यू झाला आहे,’ असा आरोप भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी शुक्रवारी केला.

आमदार गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या ईश्वरी या पत्नी होत्या. गोरखे म्हणाले, ‘दीनानाथ रुग्णालयाने १० लाख नव्हे, तर २० लाख रुपये मागितले होते. सुरुवातीला १० लाख रुपये भरण्यास सांगितले होते. आता रुग्णालयाच्या समितीने चुकीचा अहवाल दिला आहे. ईश्वरी यांच्या मृत्यूस रुग्णालयच जबाबदार आहे. डॉ. सुश्रुत घैसास आणि सुशांत भिसे यांचे मोबाइल संभाषणाचे तपशील तपासावेत. त्यातून सत्य बाहेर येईल. डॉ. धनंजय केळकर आणि सुशांत भिसे यांचे झालेले संभाषणही तपासावे. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास खरा प्रकार समोर येईल. रुग्णालय आता आपली बाजू खरी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करीत आहे. रुग्णाला कर्करोग झाल्याचे रुग्णालयाच्या समितीने म्हटले आहे. हे पूर्णपणे खोटे आहे. दीनानाथ रुग्णालयात रुग्णाची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया झाली होती. तिला कर्करोग असता, तर ती एवढे दिवस जिवंत राहू शकली असती का? गर्भधारणेसाठी त्यांनी आयव्हीएफ केले होते. आठव्या महिन्यात प्रसूती करावी लागणार असल्याने चांगल्या रुग्णालयात करावी, म्हणून त्या दीनानाथ रुग्णालयात गेल्या होत्या. कारण तेथे आधी उपचार घेतल्याने डॉक्टरांना त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती होती. रुग्णालयाने उपचार नाकारल्याने रुग्णाचा मृत्यू झाला आहे,’ असा आरोप गोरखे यांनी केला.