पुणे : चंद्रय्या मारय्या भंडारी सामाजिक व शैक्षणिक संस्था, पुणे आणि रेड स्वस्तिक सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. 14 एप्रिल 2025 रोजी मोफत महाआरोग्य व रोगनिदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कै. सुनिलशेठ भंडारी यांच्या स्मृतीदिनानिमित्त हे शिबिर होत आहे.
शिबिर सकाळी 9:30 ते सायंकाळी 5 या वेळात हॉटेल रचना समोर, शिवाजी नगर, नवीन मेट्रो स्टेशन समोर येथे होणार आहे. या आरोग्य शिबिरामध्ये हृदय, मेंदू, यकृत, किडणी, अर्धांगवायू, ब्रेनस्ट्रोक, स्त्रीरोग, नेत्र तसेच कृत्रिम अंग प्रत्यारोपणासंदर्भात तपासणी केली जाणार आहे. बीपी, शुगर, थायरॉइड, ईसीजी व रक्ताच्या सर्व तपासण्यादेखील विनामूल्य केल्या जाणार आहेत. तपासणीनंतर आवश्यकतेनुसार वरील सर्व आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत. अशी माहिती चंद्रय्या मारय्या भंडारी सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष मारुती भंडारी, रेड स्वस्तिक सोसायटीचे राज्य सचिव अशोक शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाध्यक्ष संतोष बारणे, सचिव सचिन भामरे, कोषाध्यक्ष कमलेश राक्षे, डॉ. बबन डोळस, नंदू रायगडे, डॉ. उमाकांत वाबळे, डॉ. सुपे, कॅप्टन ओमप्रकाश बहिवाल या वेळी उपस्थित होते.
हृदयरोग, मणका व मेंदूविषयक तपासणी डॉ. संजय तर्लेकर (शुश्रूषा हॉस्पिटल, मुंबई), कॅन्सरविषयक तपासणी उदय देशमुख (ऑनको लाईफ कॅन्सर सेंटर, तळेगाव), अर्धांगवायूविषयक तपासणी डॉ. सुनील साळवे (निरामय पॅरलिसिस ॲन्ड रिहॅबिलिटेशन सेंटर, लोहगाव) हे करणार आहेत. स्त्रीयांची आरोग्य तपासणी सेवा हॉस्पिटल, सांगवीच्या डॉ. अनुराधा डोळस, डॉ. मंगला सुपे, डॉ. स्मिता वाबळे करणार आहेत. महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष असणार आहे. नेत्र तपासणीनंतर मोतीबिंदू शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास शस्त्रक्रियाही मोफत केली जाणार आहे. यानिमित्त रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. हा उपक्रम सर्व नागरिकांसाठी मोफत खुला आहे.
रुग्णांनी महाशिबिराला येताना जुने रिपोर्टस् व हॉस्पिटलच्या फाईल्स सोबत आणणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी 9860756060, 9975181010 या क्रमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
14 एप्रिलला मोफत महाआरोग्य व रोगनिदान शिबिराचे आयोजन
Date: