बीड-
राज्यातील विशेषतः बीड जिल्ह्यातील कायदा सु्व्यवस्थेच्या मुद्यावरून गृह खात्यावर टीकेची झोड उठली असताना आता बीड दौऱ्यावर गेलेल्या गृह राज्यमंत्र्यांचाच मोबाईल चोरीला गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या घटनेमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अगोदरच संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बीड पोलिसांवर नवी नामुष्की ओढावली आहे.राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी शुक्रवारी बीडच्या मस्साजोगला जावून मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीच होईल, अशी ग्वाही पीडित कुटुंबीयांना दिली. यावेळी त्यांच्यासोबत माध्यमांचा ताफाही होता. माध्यमांचे सर्व कॅमेरे त्यांच्या दिशेने रोखले गेले होते. एवढेच नाही तर पोलिसांची कडेकोट सुरक्षाही त्यांच्यासोबत होती. पण त्यातही योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला गेला. पोलिस सुरक्षेच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी गृह राज्यमंत्र्यांचा मोबाईल पळवला.
योगेश कदम यांचा मोबाईल चोरीला गेल्याची बाब स्पष्ट होताच पोलिस व तिथे उपस्थित अधिकाऱ्यांनी मोबाईची शोधाशोध सुरू केली. पण त्यांना यश आले नाही. या घटनेमुळे बीडमधील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गृह राज्यमंत्र्यांनी केज पोलिस ठाण्यात आपला मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली आहे. पोलिस निरीक्षक वैभव पाटील यांनी ही माहिती दिली
विरोधकांच्या टीकेनंतर योगेश कदम यांच्या कार्यालयाने यासंबंधी एक खुलासा जारी केला. त्यात त्यांनी हरवलेला मोबाईल योगेश कदम यांचा नव्हे तर त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीचा असल्याचा दावा केला. पण कदम व उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा मोबाईल चोरीला जाणे हे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असल्याचा दावा केला जात आहे.

