SOP तयार करण्यासंदर्भात काम सुरू
रुग्णालय परिसरात आंदोलन करणे योग्य नाही. या घटनेची दखल घेतली आहे.आता शोबाजी कशाला ? या संदर्भात जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करणार आहोत. मात्र विनाकारण शो बाजी करणे बंद झाले पाहिजे. भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने जरी आंदोलन केले असेल तर ते चूक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुंबई-धर्मादाय व्यवस्था ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री कार्यालयातील आरोग्य कक्षसुद्धा धर्मदाय आयुक्तांना जोडणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील मृत्यू प्रकरणावरून त्यांनी यावेळी आपल्याच पक्षाच्या महिला आघाडीला सुनावले. मंगेशकर रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल शासनाने घेतली असून या संदर्भात योग्य ती कारवाई होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे विनाकारण ‘शो’बाजी करणे बंद झाले पाहिजे, असे देखील फडणवीसांनी म्हटले आहे.
या प्रकरणातील पीडित कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. या संदर्भात आपण त्यांना आश्वस्त केले असल्याचे देखील फडणवीस यांनी यावेळी सांगितले. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन आपण त्यांना दिले असल्याचे देखील ते म्हणाले.
केवळ या प्रकरणात कारवाई करण्या पुरते मर्यादित न राहता यापुढे असे प्रकार होऊ नये, यासाठी देखील काम करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या संदर्भात स्थापन करण्यात आलेली समिती ही सर्व प्रकारच्या त्रुटींकडे लक्ष देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भविष्यात अशाप्रकारे होऊ नये म्हणून एक SOP तयार करण्यासंदर्भात आमचे काम सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
धर्मदाय आयुक्तांच्या दुर्लक्षामुळे किंवा जास्त अधिकार नसल्याने असे प्रकार होत असल्याचा आरोप केला जातोय. याला देखील मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. या संदर्भात नवीन काही अधिकार धर्मदाय आयुक्तांना दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. संपूर्ण धर्मदाय व्यवस्था ही ऑनलाइन एका प्लॅटफॉर्मवर यावी, असे आपला प्रयत्न आहे. त्यामुळे कोणत्या रुग्णालयामध्ये किती बेड्स आहेत. किती सध्या उपलब्ध आहेत. असतील तर ते योग्य पद्धतीने गरीब रुग्णांना दिले जात आहेत का? याचे सर्व मॉनिटरिंग करता यावे यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री आरोग्य कक्षाला देखील धर्मदाय रुग्णालयांशी जोडण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. या पुढील काळात यामध्ये मोठी सुधारणा आम्ही करू शकू, असे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे.
दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे स्वर्गीय लता दीदी आणि मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारले आहे. हे एक नावाजलेले हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अनेक प्रकारचे उपचार होतात. त्यामुळेच या हॉस्पिटलचे सर्व काही चूक आहे, असे म्हणण्याचे काही कारण नाही. मात्र कालचा प्रकार हा असंवेदनशील होता. जिथे चूक आहे, तिथे चूक म्हणावी आणि ती सुधारावी लागेल. जर रुग्णालय चूक सुधारण्याचा प्रयत्न करत असेल, तर याचा आम्हाला आनंद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.