पुणे -दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गेल्या सहा वर्षात रुग्णालयाने एक रुपयाचा कर देखील भरला नसल्याची माहिती पुढे आली आहे. महापालिकेचा तब्बल 27 कोटी रुपयांचा मिळकत कर रुग्णालय प्रशासनाने थकवल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे पैशासाठी उपचार नाकारणाऱ्या या रुग्णालयाने महानगरपालिकेचा गेल्या सहा वर्षापासून तब्बल 27 कोटी 38 लाख 62 हजार 874 रुपयांचा कर थकवला आहे. एकीकडे धर्मदाय रुग्णालयाला मिळकतीवर सवलत असताना महानगरपालिकेने मात्र लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन कडे 27 कोटी रुपयांची थकबाकी दाखवली आहे.एकीकडे पालिकेचे आरोग्य खाते शहरातील रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यास टाळाटाळ करत असताना मिळकत कर विभागाने देखील ६ वर्षे याकडे डोळेझाक केल्याचे दिसते आहे .
दुसरीकडे मंगेशकर रुग्णालयातील या प्रकरणानंतर धर्मदाय आयुक्त कार्यालयाने मोठा निर्णय घेतला आहे. रुग्णालयाची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीला रुग्णालयांना दिलेल्या कडक सूचना तपासण्याचे सांगण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या या समितीला धर्मदाय नियमांची काटेकोर अंमलबजावणी होते का? हे तपासले जाणार आहे. तसेच सर्व धर्मदाय रुग्णालयाकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना राज्यातल्या सगळ्या रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. धर्मदाय रुग्णालयातील आरक्षित खाटा निर्धन आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
या बाबत समोर आलेल्या माहितीनुसार, तनिषा भिसे यांना प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्यावर तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाने दहा लाख रुपयांची मागणी केली. इतके पैसे कसे आणायचे असा प्रश्न गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांना पडला. तेव्हा जवळ सध्या दोन लाख रुपये आहेत, तेवढे घेऊन उपचार सुरू करण्याची विनंती कुटुंबीयांनी केली. मात्र तरी देखील महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून घेतले नाही. त्यानंतर गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. गर्भवती महिलेला दुसऱ्या रुग्णालयात नेत असताना महिलेला त्रास झाला आणि दोन जुळ्या बाळांना जन्म देऊन महिलेने श्वास सोडला. या घटनेने भिसे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या प्रशासनाच्या मुजोरपणा मुळे या महिलेला जीव गमवावा लागला, असा आरोप केला जात आहे. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. तसेच या रुग्णालयाला जीवा पेक्षा पैसा महत्त्वाचा झाला आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.