वाशिंग्टन- जागतिक व्यापार युद्ध आणखी वाढले. चीनने अमेरिकन आयातीवर ३४ टक्के कराची घोषणा केली. चीनचे परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, नवीन आयात कर १० एप्रिलपासून लागू होईल. चीनची ही प्रत्युत्तरादाखलची कारवाई अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलला चीनवर लावलेल्या ३४ टक्के आयात करावरील प्रतिक्रिया आहे. चीन म्हणाले, कराच्या नावाखाली अमेरिका दादागिरी करत आहे. ते सहन केले जाणार नाही.ट्रम्प यांनी ‘ट्रुथ’ सोशल वर पोस्ट केले की, चीनने अमेरिकेच्या करानंतर घबराटीतून हा कर जाहीर केला. चीनने कर लावून मोठी चूक केली आहे. अशा प्रकारचा आयात कर चीनला महागात पडेल. एका अन्य पोस्टमध्ये ते म्हणाले, करावरून धोरणात काहीही बदल केला जाणार नाही. अमेरिका आणखी श्रीमंत होणार आहे. त्यातच चीनने अमेरिकेच्या १६ कंपन्यांना सेन्सिटिव्ह टेक्नॉलॉजी ट्रान्सफरवरदेखील स्थगिती दिली आहे.
चीनकडून या कंपन्यांना सेमीकंडक्टर चिप, दुर्मिळ खनिज उदाहरणार्थ- लँथेनम, सेरियमची निर्यात होते. त्याचा वापर इलेक्ट्रिक कारपासून स्मार्ट बाॅम्ब बनवण्यापर्यंत होतो. अमेरिकेच्या या १६ कंपन्या खासगी व सरकारी क्षेत्रातील आहेत. त्या नागरी व लष्करी उपकरणे तयार करतात.चीनने अमेरिकन आयात कराच्या विरुद्ध जागतिक व्यापार संघटनेतही तीन नव्या याचिका दाखल केल्या. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनवर महिनाभरात १० टक्के-१० टक्के कर लावला.चीनवर एकूण ५४ टक्के कर लावला.
अमेरिका-चीन मध्ये व्यापार
एकूण व्यापार ५८१ अब्ज डॉलर
चीन आयात ४३८ अब्ज डॉलर
चीनला निर्यात १४३ अब्ज डॉलर
अमेरिकेला तोटा २९५ अब्ज डॉलर
दैनिक भास्करशीे विशेष करारांतर्गत
पुढे काय : प्रत्युत्तर कराच्या तयारीत ईयू, कॅनडा-मेक्सिकोही सोबत
चीनच्या प्रत्युत्तरानंतर आता ईयू (युरोपीय संघ) देखील अमेरिकेवर कर लावण्याच्या तयारीत आहे. ईयूवर ट्रम्प यांनी २० टक्के कर लावला. तेवढाच कर ईयूदेखील अमेरिकेस लावू शकते. कॅनडा-मेक्सिकोही कर वाढवू शकते.
बाजार संकोच : सेन्सेक्समध्ये ९३१ अंक घसरण, वॉल स्ट्रीटला धक्का
कर युद्धादरम्यान शुक्रवारी सेन्सेक्समध्ये ९३१ अंक तर निफ्टीमध्ये ३४६ अंकांची घसरण झाली. अमेरिकन वॉल स्ट्रीटमध्येही धक्के बसले. एसअँडपी व डाऊ जोनमध्ये घसरण झाली. जपानी निक्केईमध्येही घसरण नोंदली गेली.
व्यापार युद्ध जगाला आर्थिक मंदीत लोटू शकते, यात चीनचे पारडे जड राहणे शक्य
पहिल्या क्रमांकाची आर्थिक महाशक्ती अमेरिका व दुसऱ्या क्रमांकाची महाशक्ती चीन यांच्यातील व्यापार युद्ध जगाला आर्थिक मंदीत ढकलू शकते. चीन-अमेरिकेसह भारतावरही त्याचा परिणाम दिसू शकतो. परंतु ट्रम्प सतत कराचा मारा करत आहेत. ते पाहता चीनचे पारडे जड राहू शकते.आयात कच्चा माल, तयार उत्पादनांवरील वाढता खर्चातून महागाई वाढेल. फेडरल रिझर्व्हला व्याजदरात बदल करावा लागू शकतो. कृषी उत्पादने उदाहरणार्थ-सोयाबीन, मका, मांस इत्यादी अमेरिकेतून चीनला प्रमुख निर्यात होते. ऊर्जा क्षेत्रात तेल, नैसर्गिक गॅसवरील कर वाढेल. अमेरिकन विमान उपकरण व ऑटोमोबाइलचे सुटेभाग चिनी बाजारात महागडे होतील.
निर्यातीत घट होऊ शकते कारण चीन अमेरिकेचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. ३४ टक्के करातून त्याच्या निर्यातीत (विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रे, ग्राहकोपयोगी साहित्य) मोठी घट होऊ शकते. यातून चीनच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढेल. चीनला नवीन बाजारपेठ शोधावी लागेल. चीनच्या देशी उद्योगांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. कारण अमेरिकन सामान महागडे झाल्याने स्थानिक उत्पादनांची मागणी वाढू शकते.
अमेरिकन करामुळे चीनने आपले स्वस्त सामान भारतात डंप केल्याने भारतीय उत्पादकांचे नुकसान होऊ शकते. अशा डंपिंगपासून भारताने दक्षता बाळगावी. ही भारतासाठी आत्मनिर्भरता वाढवण्याची संधी आहे. व्यापार युद्धात भारत व चीन व्यापार वाढू शकतो. तसेही उभय देश व्यापारवाढीच्या प्रयत्नात दिसून येतात.