महापारेषणच्या वीजवाहिनीमध्ये बिघाड;
पुणे, दि. ०४ एप्रिल २०२५: महापारेषणच्या २२० केव्ही फुरसुंगी-पर्वती अतिउच्चदाब वीजवाहिनीमध्ये शुक्रवारी (दि. ४) सायंकाळी ५.४५ च्या सुमारास सुमारास बिघाड झाला. त्यामुळे शहरातील सिंहगड रस्ता, वडगाव, धायरी, किरकीटवाडी, नांदेड सिटी या परिसरातील पावणदोन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा तासभर तर नवी पेठ, जुनी पर्वती परिसरातील १४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा अर्धा तास खंडित होता.
याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या २२० केव्ही फुरसुंगी-पर्वती अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीमध्ये आज सायंकाळी ५.४५ वाजता बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या १३ उपकेंद्रांसह ६६ वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा बंद पडला. यामुळे वडगाव, धायरी, किरकटवाडी, नांदेड सिटी, नांदेड गाव, सिंहगड रस्ता आदी परिसरातील पावणदोन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सायंकाळी ६.५० वाजेपर्यंत तासभर बंद होता. तर नवी पेठ, जुनी पर्वती परिसरातील १४ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा ६.१८ वाजेपर्यंत अर्धा तास बंद होता. महापारेषणकडून इतर अतिउच्चदाब उपकेंद्रांतून महावितरणच्या १३ उपकेंद्रांना व ६६ वीजवाहिन्यांना पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा सुरु करण्यात आल्यानंतर सर्व परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला. दरम्यान, बिघाड झालेल्या वीजवाहिनीचे काम महापारेषणकडून तातडीने सुरु करण्यात आले आहे.