दिग्गज चित्रकारांची मूळ चित्रेही बघण्याची संधी

पुणे : वन्दे मातरम् या राष्ट्रमंत्राच्या सार्ध शती (150) जयंती वर्षानिमित्त तसेच ऋषी बंकिमचंद्रांच्या 131व्या स्मृतीदिनानिमित्त ऋषी बंकिमचंद्र स्मृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात सुरवातीलाच वन्दे मातरम्चा इतिहास मांडणाऱ्या तसेच गेल्या सव्वाशे वर्षात नामवंत भारतीय चित्रकारांनी रेखाटलेल्या भारतमातेच्या चित्रांचे प्रदर्शन मंगळवार, दि. 8 ते शनिवार, दि. 12 एप्रिल या कालावधीत बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आले आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन दि. 8 एप्रिल रोजी सायंकाळी 5 .30 वाजता खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ चित्रकार चंद्रशेखर जोशी, अनिल उपळेकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे, अशी माहिती प्रदर्शनाचे संयोजक मकरंद केळकर आणि वन्दे मारतम्चे अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. रवींद्र सातपुते यावेळी उपस्थित होते. दि. 12 एप्रिल पर्यंत प्रदर्शनी सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात सर्वांसाठी खुली असणार आहे.
रावबहादूर धुरंधर, दीनानाथ दलाल, रघुवीर मुळगावकर, अल्लाबक्ष, पंडित श्रीपाद दा. सातवळेकर, अवनीन्द्रनाथ ठाकूर, वासुदेव कामत, सुहास बहुळकर यांच्या मुद्रित चित्रांसह जि. भी. दीक्षित, अनिल उपळेकर, सचिन जोशी, गिरीश सहस्रबुद्धे, चंद्रशेखर जोशी यांची मूळ चित्रेही प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. संगणकीय मांडणी अनंत कुलकर्णी यांची आहे.
वन्दे मातरम्च्या 150 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत भरविण्यात येत असलेल्या ऋषी बंकिमचंद्र स्मृती महोत्सवा अंतर्गत चित्रप्रदर्शनाच्या आयोजनात वन्दे मातरम् सार्ध शती जयंती समारोह समितीचे सहकार्य लाभले आहे. ऋषी बंकिमचंद्र यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित या स्मृतीमहोत्सवाची सांगता शनिवार, दि. 12 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ‘आनंदमठ’ या संगीत नाटकाचा प्रयोगाने होणार आहे. मराठी रंगभूमीवर गेल्या 125 वर्षामध्ये आनंदमठ ही कादंबरी प्रथमच नाट्य स्वरूपात आणण्यात आली आहे. बंकिमचंद्रांच्या आनंदमठ कादंबरीवर आधारीत कोलाज क्रिएशन्स निर्मित व विनिता तेलंग लिखीत व रवीन्द्र सातपुते दिग्दर्शित या संगीत नाटकाला 2025 च्या महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धेत राज्यस्तरीय प्रथम क्रमांत व सर्वोच्च एकूण 8 पारितोषिके मिळाली आहेत. नाट्यप्रयोग सशुल्क असून चित्र प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.