पंडित शौनक अभिषेकी यांचे बहारदार गायन ; श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजन
पुणे : अविट गोडीचे राग, त्याला सप्तसुरांची साथ, तबल्याच्या थापेने निर्माण होणारे ताल आणि त्याला गायकांची सुरेल गायन साथ… अशा राग आणि सुरांनी नटलेल्या ज्येष्ठ गायक पंडित शौनक अभिषेकी यांच्या संगीत मैफिलीने सद्गुरु श्री जंगली महाराज संगीत महोत्सव बहरला.
सद्गुरु श्री जंगली महाराज यांच्या १३५ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट तर्फे आयोजित उत्सवामध्ये पंडित शौनक अभिषेकी आणि सहकारी कलाकारांनी शास्त्रीय संगीताची सुमधुर मैफल सादर केली.
पंडित शौनक अभिषेकी यांनी अबोर रागातील झपताल खयाल एक तालाने मैफिलीची सुरुवात केली . ‘नयना पार लग’ या गाण्याला तीन तालामध्ये सादर करून पंडित शौनक अभिषेकी यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. करण देवगावकर (गायन), प्रणव गुरव (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम) अतुल गरुड (तालवाद्य) यांनी पंडित अभिषेकी यांना सुरेल साथ संगत केली.
पंडित शौनक अभिषेकी यांचे विविध रागातील हरकतींचे सूर, त्याला तबला आणि संवादिनीची सुरेल साथ यामुळे जंगली महाराज मंदिराचा भक्तिमय परिसर मैफिली मुळे संगीतमय झाला होता. या संगीतमय वातावरणाचा आनंद घेत प्रेक्षकही तल्लीन झाले होते. नभास या आले पर, फुलू लागले सत्वर, पंढरीच्या वाटेवर डोह झाले, चंद्र तार्यांची केली शेज परी नाही निज लोचनांना, पाऊले हे माझे नुरे, वरी चांदणे हे झुले, घेऊन ये तू सत्वरी भेटायला, वाळवंटी ध्यान लागे, काळजाला विठ्ठल जागे, अवघे गरजे पंढरपुर, चालला नामाचा गजर अशा भक्तिमय गीतांनीही शौनक अभिषेकी यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले.
पंडित शौनक अभिषेकी म्हणाले, सद्गुरु जंगली महाराज यांच्याशी माझे कलाकार म्हणून निश्चितच काहीतरी नाते आहे, त्यामुळेच मला वारंवार या ठिकाणी माझी कला सादर करण्याची संधी मिळत आहे. या संधीचे सोने करण्याचा मी कायम प्रयत्न करीत असतो या ठिकाणी कला सादर केल्यानंतर माझ्यातील कलाकाराला अतिशय आनंद आणि समाधान मिळते.