पुणे- १० लाख का मागितले ? गर्भवती महिला का दगावली ? या महिलेला कोणता आजार होता ?कोणते धोके आणि सल्ले दिले समजावून सांगितले होते ? या बाबत दिनानाथ रुग्णालयाने अखेरीस स्पष्टीकरण दिले असून या प्रकरणाची चार तज्ञांनी चौकशी करून आपला अहवाल सादर केला आहे आणि वाकड येथील रुग्णालयात झालेल्या रुग्णाच्या मृत्यू मुले आणि अडव्हांस मागितल्याच्या रागातून दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आल्याचे या समितीने म्हटले आहे.
अहवालातील माहिती :
या प्रकरणी रुग्णालयाने खालील तज्ञांची समिती स्थापन करून आपला अहवाल तयार केला आहे.
१. वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर,
२. डॉ. अनुजा जोशी (वैद्रद्यकीय सुप्रिटेंडन्ट)
३. डॉ. समीर जोग (अतिदक्षता विभाग प्रमुख)
४. श्री. सचिन व्यवहारे (प्रशासक)
त्यांनी रुग्णाचे जुने केस पेपर्स, सध्याचे पेपर्स, संबंधित डॉक्टर यांचे जबाब नोंदवून घेतले.
१. सौ. भिसे ईश्वरी सुशांत (वृत्तपत्र व वाहिन्यांवर प्रसारित झालेले नाव सौ तनिषा सुशांत भिसे) MRD १०५३७६३. या २०२० पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार व सल्ला घेण्यासाठी येत होत्या.
२. सदर महिला रुग्णाची २०२२ साली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ५०% चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाली होती.
३. २०२३ साली या रुग्णाला रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भारपण व प्रसूती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्या विषयी सल्ला देण्यात आला होता.
४. सर्व रुग्णालयामध्ये असा संकेत असतो कि आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) कमीत कमी ३ वेळा करून घेणे आवश्यक असते. तो त्यांनी या रुग्णालयात केला नाही व त्याची या रुग्णालयास माहिती नाही.
५. १५ मार्च रोजी इंदिरा IVF चे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या. अतिशय जोखमीच्या व धोकादायक pregnancy बद्दल डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली. दर ७ दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांनी २२ तारखेस येणे अपेक्षित होते. परंतु तेव्हाही त्या आल्या नाहीत.
६. २८ मार्च २०२५ शुक्रवार रोजी सकाळी ११.३० वाजता सदर रुग्ण, पती व नातेवाईक डॉक्टर घैसास यांच्या बाह्यरुग्ण विभागात आले. ते Emergency किंवा Labour Room मध्ये आले नव्हते, याची कृपया नोंद घ्यावी.
डॉक्टर घैसास यांनी तिची तपासणी केली. ती पूर्णपणे नॉर्मल होती व तिला कुठल्याही तातडीच्या उपचाराची गरज नव्हती. परंतु जोखमीची अवस्था लक्षात घेता observation साठी भरती होण्याचा सल्ला दिला. त्याच बरोबर pregnancy व caesarean section मधील धोक्याची माहिती देण्यात आली. तसेच नवजात अर्भक कक्षाच्या (NICU) डॉक्टरांशी त्यांची भेट करून देण्यात आली. कमी वजनाची, ७ महिन्याची जुळी मुले, जुन्या आजाराची गुंतागुंत व कमीत कमी २ ते २.५ महिने NICU चे उपचार लागतील हे समजावून सांगितले व रुपये १० ते २० लाख खर्च एकंदर येऊ शकतो याची कल्पना देण्यात आली. त्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी तुम्ही भरती करून घ्या व मी प्रयत्न करतो असे सांगितले.
रुग्णाच्या नातेवाईकांनी वेद्यकीय संचालक डॉक्टर केळकर यांना फोन केला व आपली अडचण सांगितली. त्यावर डॉक्टर केळकरांनी जमतील तेवढे पैसे भरा (नातेवाईकांप्रमाणे रुपये २ ते २.५ लाख), म्हणजे मी डॉक्टर घैसास यांना सांगतो, असे सांगितले.
असाच सल्ला एका दूरच्या नातेवाईकांना सचिन व्यवहारे यांना फोनवर दिला. रुग्णाचा कोणीही नातेवाईक प्रशासन अथवा चॅरिटी डिपार्टमेंट इथे प्रत्यक्ष भेटला नाही याची कृपया नोंद घ्यावी. जेव्हा डॉक्टर केळकर यांचे ऑपेरेशन संपले व त्यांनी डॉक्टर घैसास यांना फोन केला तेव्हा त्यांनी रुग्ण न सांगता निघून गेल्याचे कळवले.
डॉक्टर घैसास ह्यांना असे वाटत होते की रुग्ण पैश्याची तजवीज करत आहे. तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून आईची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व होणाऱ्या अपुऱ्या वाढीच्या गर्भाची शुश्रूषा ससून येतील NICU मध्ये व्यवस्थित होईल. दरम्यानच्या काळात एका नर्सने रुग्ण /नातेवाईक आपली बॅग उचलून चालत गेल्याचे सांगितले. थोड्या वेळाने रुग्णाच्या नातेवाईकांकडून काहीच हालचाल न झाल्याने डॉ. घैसास यांनी रुग्णाच्या पतीला फोन केला, तो त्यांनी उचलला नाही. त्यामुळे २८ मार्च च्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले याबद्दल डॉ. घैसास व रुग्णालय प्रशासन यांना काहीच कल्पना नव्हती.
यानंतर माध्यमातून आलेल्या बातमीनंतर सर्वांना कळले की रुग्णाचा सिझेरियनमध्ये झालेल्या गुंतागुंती मुळे मृत्यू झाला.
वृत्तपत्रातील माहिती प्रमाणे, २८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता सूर्या हॉस्पिटल वाकड येथे भरती झाली व २९ मार्च राजी सकाळी सिझेरियन झाले. दीनानाथमधून सदर रुग्ण ससून व तिथून सूर्या हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या गाडीने गेला व सिझेरियन सुद्धा दुसऱ्या दिवशी झाले ह्याची नोंद घ्यावी. तसेच सूर्या हॉस्पिटल मधील माहितीनुसार आधीच्या operation ची व कॅन्सर संबंधीची व तिच्या नातेवाईकांनी माहिती लपवून ठेवली असे समजते.
सदर चौकशीअंती व रुग्णालयातील इतर सिनियर gynaecologist च्या opinion नुसार आमच्या समितीचा निष्कर्ष खालीलप्रमाणे :
१. सदर रुग्णासाठी Twin Pregnancy धोकादायक होती.
२माहितीचे रुग्णालय असून सुद्धा ANC चेकअप पहिले सहा महिने रुग्णालयात आल्या नाहीत.
३ Advance मागितल्याच्या रागातून सदर तक्रार केलेली दिसते.
रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मानले नाहीत तसेच वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ऍडमिट होण्याचा सल्ला पण त्यांनी पाळला नाही.
रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा व advance मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारी तक्रार करण्यात आली आहे असे समितीचे मत आहे.


