अभिनेते मनोजकुमार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली भारतीय सिनेसृष्टीतील महान युगाचा अंत-उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि.4 :- ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि ‘भारतकुमार’ म्हणून ओळखले जाणारे मनोजकुमार यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका महान युगाचा अस्त झाला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून जनमानसात देशप्रेम जागवले. ‘उपकार’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांनी त्यांनी समाजातील वास्तव आणि देशासाठी असलेली निष्ठा मोठ्या ताकदीने मांडली. त्यांच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात असलेली राष्ट्रभक्ती ही आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेले योगदान अमूल्य असून त्यांची जागा कधीही भरून निघणारी नाही. ‘दादासाहेब फाळके’, ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त असलेले मनोज कुमार हे अनेक नवोदित कलाकारांचे प्रेरणास्थान होते.
त्यांच्या निधनाने हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार हरपला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशी प्रार्थना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात केली आहे.