वार्षिक 1 रुपया भाड्याने 795 चौ. मीटर जमीन
पुणे-केवळ प्रसूतीसाठी 10 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला सरकारने वार्षिक 1 रुपया दराने हजारो चौरस फूट जागा भाड्याने दिल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. या प्रकरणी सरकारच्या 18 फेब्रुवारी 2025 रोजीच्या एका मंत्रिमंडळ निर्णयावर हरकत घेतली जात आहे.
भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे यांचे प्रसूतीनंतर झालेल्या गुंतागुंतीमुळे निधन झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तब्बल 10 लाख रुपयांचे डिपॉझिट मागितले होते. पैसे जमा केल्याशिवाय उपचार करणार नाही अशी आडमुठी भूमिका रुग्णालयाने या प्रकरणी घेतली होती. त्यामुळे तनिषा यांचा उपचारास विलंब झाल्यामुळे मृत्यू झाला, असा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला वार्षिक 1 रुपया भाड्याने जमीन दिल्याची बाब समोर आली आहे.
यासंबंधीच्या माहितीनुसार, दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशन ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरला एरंडवणा येथील जमीन देण्यात आली आहे. ट्रस्टने कर्वेनगर येथील जमीन खरेदी केली आहे. या दोन्ही मिळकतीच्या दरम्यान नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यासाठी 795 चौरस मीटर जमिनीची गरज असल्याची मागणी ट्रस्टने केली होती. त्यानुसार त्यांना ही जमीन वार्षिक 1 रुपया या नाममात्र दराने भाडेपट्ट्याने देण्यास मंजुरी दिली आहे. सरकारने 18 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. हा निर्णय आता वादात सापडला आहे.केवळ प्रसूतीसाठी 10 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या या हॉस्पिटलला नाममात्र दरात जमीन देण्याची गरज काय? असा सवाल आता सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही या प्रकरणी सरकारवर टीका केली आहे. आत्ता… आत्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्य शासनाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला पुण्यातील जवळपास आठ हजार चौरस फुट जागा वार्षिक नाम मात्र एक रुपया भाड्याने दिली आहे.
यापूर्वी रुग्णालयासाठी दिलेली जमीन ही अशीच नामामात्र भाड्याने दिलेली आहे. आत्ता दिलेल्या जमिनीची किंमत सध्याच्या बाजार भावाने कमीत कमी 10 कोटी रूपये तरी असेल. रुग्णालयाने मात्र 10 लाख रूपये आगाऊ भरले नाहीत म्हणून उपचार नाकारले आणि रूग्ण दगावला. काय अर्थ लावायचा या सगळ्यांचा? असे कुंभार यांनी म्हटले आहे. त्यांनी या शासननिर्णयाचे फोटो आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केलेत.पुण्यातील दीनानाथ मंगेशकर फाऊंडेशन हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटरला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन नाममात्र दराने वार्षिक भाडेपट्ट्याने देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
या ट्रस्टला हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटरसाठी मौ. एरंडवणा येथे जमीन देण्यात आली आहे. या शिवाय ट्रस्टने मौजे कर्वेनगर येथील जमीन खरेदी केली आहे. या दोन्ही मिळकतीच्या दरम्यान हा नाला आहे. या नाल्यावर पूल बांधण्यासाठी 795 चौ. मीटर जमिनीची आवश्यकता असल्याची मागणी ट्रस्टने केली आहे. त्यानुसार ही जमीन वार्षिक 1 रुपया या नाममात्र दराने भाडेपट्ट्याने देम्यास मंजुरी देण्यात आली. नाल्यावरील पुलाच्या बांधकामाचा खर्च हा संबंधित ट्रस्ट करणार आहे. या पुलामुळे रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक, रुग्णवाहिका, रुग्णांच्या नातेवाईकांचे वाहने व ट्रस्टचे संबंधित वैद्यकीय अधिकारी – कर्माचरी यांना ये-जा करणे सूकर होणार आहे, असे सरकारने आपल्या आदेशात म्हटले होते.