पुणे: 10 लाख रुपये अनामत रक्कम भरली नाही म्हणून गर्भवती महिलेला वाऱ्यावर सोडून दिल्या प्रकरणी पुणे महापालिकेचं आरोग्य खाते नेमके करतंय काय? त्यांचा रुग्णालयावर अंकुश हरवला कुठे? असे सवाल होत असताना आता या प्रकरणी महिला आयोगाने महापालिकेला झापले आहे. आयोगाच्या प्रमुख रुपाली चाकणकर यांनी महापालिकेला याबाबत तातडीने अहवाल ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात आयोगाने महापालिकेला लेखी आदेश पाठविले आहेत त्यात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम, १९९३ अंतर्गत कलम १०(१) (फ) (एक) व (२) नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे आणि त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे याकरीता प्राधिकृत करण्यात आले आहे.
पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका महिलेचा २ जुळ्या मुलींना जन्म देवून मृत्यू झाला. तसेच सदर महिलेस अॅडमिट होण्याआधीच पैशाची मागणी करण्यात आली होती. अशी बातमी प्रसार माध्यमाद्वारे प्रसारीत होत आहे. या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.सदर प्रकरणी तथ्य तपासून योग्य ती नियमानुसार चौकशी करुन कार्यवाही करावी व आपण केलेल्या कार्यवाहीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा, १९९३ कलम १२(२) व १२ (३) नुसार आयोगास mscwmahilaayog@gmail.com या ई-मेल वर तात्काळ पाठविण्यात यावा, .