पुणे:भाजपचे आमदार आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात एका महिलेला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता याप्रकरणी पुण्यातील माजी आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.सातारा पोलीस पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील प्रभाकर देशमुख यांच्या घरी दाखल झाले असून त्यांची तब्बल तीन तास चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेच्या संपर्कात प्रभाकर देशमुख होते, असे सांगितले होते. त्यामुळे देशमुख यांची चौकशी सातारा पोलिसांकडून करण्यात आली. तब्बल तीन तास चौकशी करून सातारा पोलीस प्रभाकर देशमुख यांच्या घरून रवाना झाले आहेत. यामुळे आता या प्रकरणी कोणती नवी माहिती मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी एका महिलेला रंगेहात पकडण्यात आले होते. तसेच सातत्याने आरोप करणारे पत्रकार तुषार खरात यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणासंदर्भात माझी आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांचं नाव समोर आल्याने त्यांची चौकशी केली जात आहे.प्रभाकर देशमुखांवरील कारवाईबाबत मंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया देखील समोर आली आहे. ते म्हणाले, खंडणी प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्याबाबत आत्ता पोलीस तपास सुरू आहे. काही गोष्टी अजून पुढे यायच्या आहेत. त्यामुळे मी काही बोलणार नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे, त्यांना तपास करू द्या असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.