पुणे:
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बेजबादारपणामुळं एका गर्भवती महिलेच्या मृत्यूनंतर आता हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं आहे. कारण आता पुणे पोलिसांचे काही वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात पोहोचले आहेत. त्यांनी चौकशी सुरू केली आहे.रुग्णालयानं संबंधित महिला रुग्णाला उपचारांसाठी भरती करुन घेण्यासाठी नेमका किती खर्च सांगितला? तसंच उपचारांसाठी नकार का दिला? याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे.तनिषा उर्फ मोनाली भिसे या गर्भवती महिलेचा वेळेत उपचार न मिळाल्यामुळं मृत्यू झाला. त्यांना कुठले आणि कोणी उपचार दिले? त्यांच्या कुटुंबियांकडं किती रुपयांची मागणी करण्यात आली? कुटुंबियांनी केलेल्या आरोपांनुसार यासाठी कुठले डॉक्टर जबाबदार आहेत? याची देखील पोलिसांकडून प्राथमिक चौकशी सुरू केली जात आहे. त्याचबरोबर अलंकार पोलिस ठाण्यात भिसे कुटुंबियांकडून जबाबही नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणी आ अमित गोरखे यांनी x वर आपली कैफियत मांडली होती . ती पहा ऐका..
मृत्यू झालेली गर्भवती महिला ही भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या. एका आमदाराच्या पीएवर ओढवलेल्या या दुःखद प्रसंगाला केवळ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं प्रशासनच कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप खुद्द आमदार गोरखे यांनी केला आहे. त्यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं देखील याबाबत तक्रार केली आहे. तसंच या रुग्णालयावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. जर आमदाराच्या पीएवर ही वेळ येत असेल तर सर्वसामान्य नागरिकांची इथं काय अवस्था असेल? असा सवालही त्यांनी केला आहे.
ऐपत नसेल तर ससूनला जा…
तनिषा ऊर्फ मोनाली भिसे या जुळ्या मुलांना जन्म देणार होत्या. त्यांच्या प्रसूती कळा येऊ लागल्यानंतर त्यांना रक्तस्राव होऊ लागला त्यानंतर त्यांचा बीपी वाढला होता. त्यामुळं त्यांना कुटुंबियांनी तातडीनं मंगेशकर रुग्णालयात हलवलं. पण इथं आणल्यानंतर बराच काळ त्यांना ओपीडीमध्ये ठेवण्यात आलं. त्यानंतर कुटुंबियांना २० लाख रुपये खर्च सांगण्यात आला. यानंतर एका डॉक्टरनं १० लाख रुपये भरावे लागतील असं सांगितलं. यांपैकी ३ लाख रुपये सुरुवातीला भरण्याची तयारी कुटुंबियांनी दाखवली. पण तरीही या रुग्णालयानं त्यांना अॅडमिट करुन घेतलं नाही, उलट ऐपत नसेल तर ससूनला जा असा सल्लाही दिला, अशी माहिती भिसेंच्या कुटुंबियांनी दिली आहे.दरम्यान, या सर्व गोंधळात दुसऱ्या रुग्णालयात नेल्यानंतर या महिलेनं जुळ्यांना जन्म दिला पण गर्भवती महिलेचा बीपी वाढल्यानं व भीतीमुळं तिनं आपले प्राण गमावले.