सोलापूर -देशात तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये कौटुंबिक कलाहातून पुरुष आत्महत्या करत असल्याच्या तसेच पती-पत्नीच्या वादातून पतीची हत्या केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये घडलेल्या घटनेने तर एकच खळबळ उडवली होती. प्रियकराच्या मदतीने पत्नीने आपल्याच पतीची हत्या करून त्याचे तुकडे करत एका ड्रममध्ये ठेवले होते. या पार्श्वभूमीवर आता पुरुष हक्क आयोगाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
राज्यात सध्या ज्या पद्धतीने महिलांकडून क्रूर हत्येचे प्रकार समोर येत आहेत, ते पाहता पुरुषांना न्याय व अधिकार देण्यासाठी पुरुष हक्क आयोगाची स्थापना करण्याची गरज वाटू लागली असल्याचे भूमाता ब्रिगेड संघटनेच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. पुरुष आणि महिला दोघांनाही समान न्याय असला तरी पूर्वी महिलांवर होणरे अत्याचार थांबवण्यासाठी महिला आयोगाची स्थापना झाली होती. मात्र, सध्याच्या काळात महिला ज्या पद्धतीने वागत आहेत, ते पाहता पुरुषांसाठी पुरुष हक्क आयोगाची निर्मिती करण्याची वेळ आली असल्याचे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.
तृप्ती देसाई म्हणाल्या, नुसते समुपदेशन करून भागणार नसून महिलांनाही आपण काय वागतो याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. राज्यात पुरुष हक्क आयोग स्थान झाल्यास पुरुषांनाही न्याय व अधिकार मिळतील. महिलांच्या प्रश्नावर नेहमी पुढाकार घेणाऱ्या तृप्ती देसाई यांनी आता अलीकडच्या काळात पुरुषांवर होणारे अत्याचार, त्यांचा मानसिक छळ तसेच क्रूर हत्या पाहता पुरुषांच्या हक्कासाठी आता तृप्ती देसाई यांनी पुढाकार घेतला आहे.
तृप्ती देसाई यांनी यावेळी बोलताना राज्यातील महिलांच्या कर्तुत्ववार देखील भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, सध्या राज्यातील महिला अनेक कर्तुत्वाची कामे करत असल्याने राज्याच्या मुख्यमंत्री पदावर महिला विराजमान व्हावी. राज्यात मुख्यमंत्री बदलाची वेळ आली तर भाजपने महिलांना संधी द्यावी. पंकजा मुंडे या आक्रमक चेहरा असून त्यांना मुख्यमंत्री केल्यास आमची काहीच हरकत असणार नसल्याचेही तृप्ती देसाई म्हणाल्या.