वक्फ बोर्डाच्या जमिनी कोणत्या नेत्यांनी हडपल्या.. वस्तुस्थिती जाहीर करावी – सरकारने कोणत्या नेत्याच्या नावावर किती जमीन आहे याची आकडेवारी काढावी. त्यांना वस्तुस्थिती समजेल. अनेक राजकीय नेत्यांनी वक्फ बोर्डाच्या जमिनी हडप केल्या आहेत. या विधेयकांतर्गत पंतप्रधान मोदींच्या निकटवर्तीयांना जमिनी देण्याचा घाट घालण्यात आला आहे. सरकारला नवा कायदा आणण्याची काहीच गरज नव्हती. आता आम्हाला सुप्रीम कोर्टाकडून कोणतीही अपेक्षा राहिली नाही. तिथे प्रामाणिक लोक असणे गरजेचे आहे. तेथील न्यायाधीश सेवानिवृत्त झाल्यानंतर मोदींकडे जावून बसतात, असेही जलील यावेळी बोलताना म्हणाले.
एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून भाजपवर तिखट हल्ला चढवला आहे. भाजप वक्फ सुधारणा विधेयकाद्वारे वक्फ बोर्डात हुशार नॉन मुस्लिम सदस्य आणणार आहे. मग आमच्या समाजात हुशार लोक नाहीत का? आता ते आम्हाला शिर्डी व तिरुपती संस्थानच्या बोर्डावर घेणार का? केवळ वक्फसाठीच हा निर्णय का? असे विविध प्रश्न जलील यांनी या प्रकरणी उपस्थित केलेत.
लोकसभेने बुधवारी मध्यरात्री 2 वा. वक्फ सुधारणा विधेयकावर आपली मोहोर उमटवली. इम्तियाज जलील यांनी गुरुवारी या प्रकरणी बोलताना भाजपवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, आम्ही वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध केला. हा विरोध यापुढेही कायम असेल. कालच्या भाषणातून त्यांनी केवळ मुस्लिम समाजाचा विषय घेतला. त्यातून वाद निर्माण केला. ट्रिपल तलाक झाला. औरंगजेब झाला. आता या विधेयकाच्या माध्यमातून नवा मुस्लिम विरोध सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी समर्थन व विरोधाच्या आकड्यात फार मोठा फरक नाही. सरकार मुस्लिम समाजाला न्याय देण्यासाठी व महिलांना बोर्डात स्थान देण्यासाठी हे विधेयक आणल्याचा दावा करत आहे. पण त्यांनी लाडक्या बहिणींना न्याय दिला का?
मी सुरुवातीपासून वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात होतो. वक्फ बोर्ड जो निर्णय घेत होता तो निर्णय घेण्याचा अधिकार आता या विधेयकाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. सरकारने वक्फ बोर्डावर बिगर मुस्लिमांना घेण्याचा निर्णय घेतला आहे सरकार असेच करणार असेल, तर तुम्ही इम्तियाज जलीलला शिर्डीच्या साईबाबा संस्थान मंदिराच्या बोर्डावर घेणार का? तिरुपती बालाजी येथील ट्रस्टवर मला घेणार का? असा सवालही इम्तियाज जलील यांनी यावेळी उपस्थित केला.