मुंबई-मोहम्मद अली जिना यांना जे जमले नाही, ते भाजपने करून दाखवले, अशा जहाल शब्दांत गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल मोदी सरकारवर टीका केली. वक्फ विधेयक मुस्लिमांच्या हिताचे असेल, तर तुम्ही हिंदुत्व सोडले का, सवालही त्यांनी केला. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका सविस्तर मांडली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही बिलाला विरोध केला नाही तर भाजपच्या ढोंगाला आणि भ्रष्टाचाराला विरोध केला. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाचे आणि हिंदुत्वाचे काय देणे घेणे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तुम्ही मुसलमानांचे लांगुलचलन करत असाल तर हिंदूंनी काय केले? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.
नुकतीच रमजान ईद झाली आहे. ईदच्या या सर्व लोकांनी मेजवान्या झोडल्या आहेत. ईदच्या मेजवान्या झोडून या लोकांनी काल वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडले आहे. मात्र, यामध्ये मंत्री किरण रिजिजू यांनी हे विधेयक मांडले हा योगायोग आहे. याच किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचे समर्थन केले होते. त्यामुळे हा योगायोग घडवून आणला आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. नेमके भारतीय जनता पक्ष काय करतोय, हे देखील मला अद्याप कळाले नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.