शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक
दिल्ली-छत्रपती शिवाजी महाराज हे 100 टक्के सेक्युलर होते, छत्रपती शिवाजी महाराज आदर्श शासक होते, न्यायप्रिय होते, कल्याणकारी राजे होते, आदर्श पिताही होते, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक लढाया जिंकल्या पण त्यांनी कधीही मशिदीवर हल्ला केला नाही. लढाई जिंकल्यानंतर महिला शरण आल्या त्यावेळी ते सन्मानाने वागले.
नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र इंग्रजीत येत आहे ही आनंदाची बातमी आहे. आमच्या मनात आई-वडिलांपेक्षा शिवाजी महाराजांचे स्थान मोठे आहे. प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या दोन इंग्रजी पुस्तकांचा प्रकाशन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
नितीन गडकरी म्हणाले की, अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची प्रतापगडावर भेट झाली. तेव्हा शिवाजी महाराज यांच्यावर अफजल खान याने वार केला. तेव्हा शिवाजी महाराज यांनी अफजल खानाचा वध केला. त्यानंतर शिवाजी महाराज यांनी आदेश दिला की अफजल खानाची कबर सन्मानाने झाली पाहिजे. आजकाल सेक्युलर हा शब्द खूप प्रचलित आहे. या शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीत दिलेला अर्थ धर्मनिरपेक्षता नाही. सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे सर्वधर्मसमभाव. सगळ्या धर्मांशी न्यायाने वागणे हा सेक्युलर शब्दाचा अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होते जे 100 टक्के सेक्युलर होते.
नितीन गडकरी म्हणाले की, जात पात धर्म पंथ याने व्यक्ती मोठा होत नाही तर पराक्रमाने मोठा होतो. शिवाजी महाराज यांचं कार्य फक्त महाराष्ट्र पुरत मर्यादित न राहता जगभर जायला हवे. त्यांच्या सैन्यात सैन्यात मुस्लिम सैनिक देखील होते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने माघारी पाठवले. वेळ प्रसंगी शिवाजी महाराज यांनी मुलाला शिक्षा करायला देखील मागे पुढे पाहिले नाही. नाहीतर राजकारणात आजकाल सगळे आपली मुले, मुली आणि पत्नी यांना तिकीट मागतात.

