पुणे, 2 एप्रिल 2025 – एलएनजे भिलवाडा समूहाचा एक भाग असलेल्या रीप्लस या अग्रेसर बॅटरी उत्पादक कंपनीने आपल्या विद्यमान १ जीडब्ल्यूएच उत्पादन क्षमतेचा विस्तार पुढील वर्षभरात ६ जीडब्ल्यूएचपर्यंत करण्याचा आराखडा जाहीर केला आहे. विद्युत वाहने (ईव्ही) आणि ऊर्जा साठवण प्रणाली (ईएसएस) या क्षेत्रातील वेगाने वाढणाऱ्या भारतीय बाजारपेठेची गरज पूर्ण करण्यासाठी ही मोठी क्षमतावाढ करण्यात येणार असून नवीन पिढीच्या बॅटरी तंत्रज्ञानाचा यात समावेश असेल.
अपग्रेड केलेल्या ‘रीप्लस ६ जीडब्ल्यूएच’ प्रकल्पामध्ये खालील वैशिष्ट्ये असतील:
हाय–स्पीड ऑटोमेशन उत्पादन प्रक्रिया – ऑटोमेशन, एआय व डेटा यांवर आधारित उत्पादन, रिअल-टाइम मॉनिटरिंग, मशीन व्हिजन, रोबोटिक प्रणाली, स्वयंचलित साहित्य हाताळणी आणि लेझर वेल्डिंग यांचा समावेश करून उत्पादन क्षमता वाढवली जाईल, तसेच कार्बन फूटप्रिंट कमी करून पर्यावरणीय शाश्वतता सुनिश्चित केली जाईल.
प्रगत सेल केमिस्ट्रीचा अवलंब – बाजाराच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन कंपनीच्या कारखान्यात सेल केमिस्ट्रीचा व तत्सम तंत्रज्ञानाचा अवलंब केला जाईल. त्यामध्ये हाय-एनर्जी डेन्सिटी सेल्स, ब्लेड सेल्स, भविष्यातील सेल केमिस्ट्रीसाठी सज्ज एनए-आयन, एलएमएफपी, एलटीओ यांसारख्या प्रगत सेल्स हाताळण्याची क्षमता असलेले तंत्रज्ञान समाविष्ट असेल.
नेक्स्ट–जेन प्रॉडक्ट्स – या प्रकल्पातून विद्युत प्रवासी वाहने, विद्युत बस, ट्रक तसेच ग्रिड-स्केल नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांसाठी प्रगत बॅटरी पॅक्स आणि लिक्विड-कूल्ड बीईएसएस कंटेनर सोल्यूशन्स विकसित केली जातील.
या प्रसंगी एलएनजे भिलवाडा समूहाचे उपाध्यक्ष रिजू झुंझुनवाला म्हणाले, “एलएनजे भिलवाडा समूहाने नेहमीच स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानाच्या प्रगतीत अग्रणी भूमिका बजावली आहे. रीप्लस प्रकल्पाचा ६ जीडब्ल्यूएचपर्यंतचा विस्तार हा भारताच्या शाश्वत विकास आणि ऊर्जा संक्रमणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.”
‘रीप्लस’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी हिरेन प्रविण शाह म्हणाले, “या विस्ताराच्या अनुषंगाने, रीप्लस कंपनी जागतिक स्तरावर ऊर्जा साठवण क्षेत्राचा भविष्य घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. उच्च-गती स्वयंचलित प्रक्रिया आणि नवीन पिढीच्या बॅटरी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आम्ही ईव्ही आणि ईएसएस यांसाठी सर्वोत्तम उत्पादने विकसित करण्यास कटिबद्ध आहोत.”
रीप्लस आपल्या बॅटरी उत्पादन क्षमतेत वाढ करत ‘आत्मनिर्भर भारत’ मिशनमध्ये योगदान देत आहे, आणि भारतातील स्थानीय उत्पादन व स्वावलंबनाला बळकटी देत आहे.