श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सवात ‘मास्टर कीज’ या दीप्ती कुलकर्णी व सहकारी यांचा कार्यक्रम ; उत्सवाचे २६४ वे वर्ष
पुणे : शाकुंतल नाटकातील अजरामर झालेली ‘पंचतुंड नररुंड मालधर…‘ या नांदी पासून ते संवादिनीवर वाजविण्यात येणाऱ्या विविध रांगांची ओळख करून देताना सादर झालेले गणेशस्तुती करणारे ‘धीमहि’ हे गीत सादर करीत रसिकांशी सुरेल सुसंवाद साधला गेला. संवादिनीला विविध वाद्यांची साथ मिळाल्यावर उमटलेले स्वर कानावर पडताच रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘मास्टर कीज’ या दिप्ती कुलकर्णी व सहकारी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे.
ओम नमो जी आद्या.. या गणेश गीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. कट्यार काळजात घुसली मधील दिल की तपिश… या गीताच्या सादरीकरणाला विशेष दाद मिळाली. कुहू कुहू बोले कोयलिया… सुरत पिया की झीन बिसराई… या हिंदी गीतांसह बाई मी विकत घेतला शाम… मन शुद्ध तुझं… कसा बेभान हा वारा… ही गीते देखील रसिकांच्या पसंतीस उतरली.
गीतरामायणातील निवडक गीते आणि पियानिका या वाद्यावर सादर झालेले या डोळ्याची दोन पाखरे…या गीताने उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. विक्रम भट, केदार परांजपे, अजय अत्रे यांनी साथसंगत केली. रवींद्र खरे यांनी निवेदन केले. शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी सानिया कुलकर्णी यांची गायनसेवा होणार आहे. हा कार्यक्रम रात्री ८.३० वाजता होणार असून सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे.