पुणे दि. २ – ज्येष्ठ संपादक मनोहर कुलकर्णी यांच्या हस्ते ‘ स्वामी गीतग़गा’ या गीतसंग्रहाचे प्रकाशन उत्साहात झाले.सदाशिव पेठ येथील ब्राह्मण मंगल कार्यालय सभागृहात सोमवार, ३१ मार्च रोजी सायंकाळी हा कार्यक्रम झाला.यावेळी गीतकार रवींद्र काशीकर,प्रकाशक मिलींद जोरी,डॉ. भाग्यश्री हर्षे, प्रा. श्रीकांत काशीकर हे मंचावर उपस्थित होते.
रवींद्र काशीकर यांच्या भगिनी व ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या निवृत्त उपप्राचार्या डॉ. भाग्यश्री हर्षे यांनी वडील गोविंदराव व आई प्रतिभा यांचे स्मरण करून प्रास्ताविकात गीत संग्रहाचा परिचय करून दिला. काशीकर कुटुंबाला लाभलेल्या अध्यात्मिक,सामाजिक व सांस्कृतिक वारश्यामुळेच माझ्या बंधूंना गीतलेखनाची प्रेरणा मिळाली. ‘भिऊ नकोस मी पाठीशी आहे’ हा श्री स्वामीचा विचार. आम्हाला सदैव आश्वस्त करतो.श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या प्रगटदिनी त्यांच्याच भक्तीचे गुणवर्णन करणारा हा ग्रंथ प्रकान
होणे हा एक शुभ योग आहे असेही त्या म्हणाल्या.
गीतकार रवींद्र काशीकर यांनी गीतलेखन कसे सुचले हे सांगितले. दहाबारा वर्षांपूर्वीच यातले काही लेखन झाले आहे. ‘स्वामी गीतगंगा’ पूर्ण झाल्यावर त्याचे सहासात कार्यक्रमही झाले. असे सांगत छत्रपती संभाजीनगरला गतवर्षी मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या व्याख्यानमालेत झालेल्या कार्यक्रमानंतर ‘स्वामी गीतगंगा’ चे पुस्तक रुपात प्रकाशन करण्याची कल्पना पुढे आली. केंद्राचे सचिव व माझे चुलतबंधु प्रा.श्रीकांत काशीकर यांनी या संदर्भात सारथी प्रकाशनचे मिलींद जोरी यांच्याशी संपर्क साधला व श्री.जोरी यांनीही यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.आणि सर्व योग जुळून आज हे पुस्तक प्रकाशित होत आहे.
ज्येष्ठ संपादक मनोहर कुलकर्णी यांनी चोपन्न गीतांचा हा भक्ती रसपूर्ण गीत संग्रह अतिशय सोप्या व सरळ भाषेत आहे हे सांगताना या गीतांमध्ये ‘लय, छंद व गेयता आहे’ हे पुस्तकाच्या प्रस्तावनेत अंजली कऱ्हाडकर यांनी केलेले वर्णन अगदी सत्य आहे हे पुस्तक वाचताना मी अनुभवले आहे असेही सांगितले.आजच्या बदलत्या वैज्ञानिक प्रगतीच्या काळातही अशा पुस्तकांची गरज आहे.अध्यात्म व विज्ञान हे दोन्ही हातात हात घालून चालणे हे राष्ट्रविकासासाठी गरजेचे आहे. असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
संत झुलेलाल, गुरु अंगददेव,श्री स्वामी अक्कलकोट महाराज यांच्या जयंतीदिनी प्रकाशित होणाऱ्या या ग्रंथरचनेमागे काशीकर कुटुंबाच्या वाचन, लेखन, मुद्रण क्षेत्रांशी असलेल्या नातेसंबंधाचाही फार मोठा भाग आहे असे मत सूत्रसंचालक प्रा. श्रीकांत काशीकर यांनी व्यक्त केले. उपस्थितांचे स्वागत व आभार प्रदर्शन सौ.गौरी काशीकर – समुद्र यांनी पाहुण्यांचा परिचय भूषण हर्षे यांनी करून दिला. ईशस्तवन चार वर्षांच्या कु.आर्या समीर काशीकर हिने सादर केले.
प्रारंभी मनोहर कुलकर्णी यांचे स्वागत रवींद्र काशीकर यांनी तर प्रकाशक मिलिंद जोशी यांचे स्वागत डॉ.भाग्यश्री हर्षे यांनी केले. याच कार्यक्रमात मंगलमूर्ती संस्कार केंद्राच्या अध्यक्षा सौ. मानसी श्रीकांत काशीकर यांनी रवींद्र काशीकर यांचा शाल व श्रीफल देऊन सन्मान केला.
कार्यक्रमास माध्यम क्षेत्रातील गोपाळ जोशी,प्रकाश देशपांडे यासह अन्यही काही मान्यवर, काशीकर परिवारातील सदस्य, तसेच स्वामी भक्त बहुसंख्येने उपस्थित होते. प्रकाशन समारंभानंतर ‘स्वामी गीतगंगा’ मधील काही गीते रवींद्र काशीकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केली.

