पुणे- #smartcity #pune-मोदी यांच्या पहिल्या ड्रीम प्रोजेक्ट ‘ स्मार्ट सिटी ‘ चा अपयशी अंत झाल्याची टीका आम आदमी पार्टी चे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे.
किर्दत म्हणाले ,’केंद्र सरकारने 2015 मध्ये स्मार्ट सिटी मिशन ची सुरुवात केली आणि स्पर्धेनंतर 100 शहरे ठरवली . स्मार्ट सिटी हे पंतप्रधान मोदी यांनी निवडून आल्यानंतर देशभर राबविलेला पहिला विकास प्रकल्प होता आणि तो अक्षरशः गुंडाळावा लागलेला आहे. भाजप सरकारच्या अनेक इतर योजनांवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले परंतु स्मार्ट सिटी मध्ये प्रत्येक गोष्टीचे संख्यात्मक आणि गुणात्मक दर्जा संदर्भात परीक्षण पडताळणी करणे शक्य आहे त्यामुळे हे मोदी यांच्या ड्रीम प्रोजेक्ट चे अपयश लक्षणीय ठरणारे आहे.
या योजनेमध्ये पुणेकरांनी अपेक्षा म्हणून ‘वाहतूक कोंडी’ हा मुख्य विषय लाखो सूचनाद्वारे मांडला होता व पुणे शहरासाठी त्यावर सुधारणा अपेक्षित होत्या. परंतु प्रत्यक्षात मात्र ‘क्षेत्रनिहाय’ विकास योजना राबवण्यात आली आणि त्यासाठी आधीच विकसित असलेला व मोकळ्या जागा उपलब्ध असलेला औंध व इतर परिसर निवडण्यात आला. तेव्हापासूनच हा प्रकल्प दिखावा असल्याचे लक्षात येऊ लागले होते. याचे एक उदाहरण म्हणजे स्मार्ट सिटी अंतर्गत शाळांसाठी सुविधा द्यायच्या होत्या. औंध भागात काही शाळेमध्ये या योजनेअंतर्गत वेगळे अतिरिक्त सुरक्षारक्षक पुण्यात आले आणि तेच स्मार्ट सिटी चे काम म्हणून सांगण्यात आले.
ए टी एम एस हा सिग्नल यंत्रणा प्रकल्प फायदा देत असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात त्याचा परिणाम, यश मोजणारी कुठलीही यंत्रणा अथवा परीक्षण पद्धती कंपनीने अथवा महानगरपालिकेने प्रात्यक्षिक स्वरूपात दर्शवलेली नाही. त्यामुळे त्याची यशस्विता ही संशयास्पद आहे. सायकल योजना आणि थीम बेस उद्याने हे पूर्णपणे अपयशी ठरले आहेत.
या स्मार्ट सिटी प्रकल्पावर किती खर्च झाला, खर्च कुठे केला, त्याचा फायदा काय झाला याचे सविस्तर विश्लेषण स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड ने देणे आवश्यक आहे. जनतेच्या मोठ्या अपेक्षा असलेल्या या प्रोजेक्ट चा उल्लेख मोदी वा भाजप ने कुठल्याही निवडणूक प्रचारात केला नाही हे ही नोंदवण्याजोगे असल्याची टीका आम आदमी पार्टी ने केली आहे.
,