भाजपला जेव्हा मिश्या फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशीला पिळ देत देशभर फिरतो आहोत.
संजय राऊत म्हणाले की, वक्फच्या साडेआठ लाख मालमत्ता आहेत. त्यांची किंमत अडीच लाख कोटी रुपये झाली आहे. या संपत्तीवर काही सरकारच्या लाडक्या उद्योगपतींचा डोळा आहे त्यासाठी हा कार्यक्रम सुरू आहे. त्याला हिंदुत्वाचे नाव दिले असले तरी त्यांचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही.
मुंबई-वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा संबंध नाही. उद्योजकांना वक्फ बोर्डाची जमीन खरेदी करण्यासाठी हे सर्व काही सुरू आहे असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.संजय राऊत पुढे बोलताना म्हटले की, देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे शिकवू नये. भाजपला जेव्हा मिश्या फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशीला पिळ देत देशभर फिरतो आहोत.
संजय राऊत म्हणाले की, आम्ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असल्यानं कलम 370 ला पाठिंबा दिला. देशभरातील लाखो गरीब महिलांचा प्रश्न असल्याने तिहेरी तलाकलाही आमचा पाठिंबा होता. मात्र वक्फ बिलाचा मुद्दा हा हिंदुत्वाचा नाही, तर संपत्तीचा आहे. देशभरात वक्फच्या लाखो प्रॉप्रटी आहेत. त्या प्रॉपर्टीवर काही लाडक्या उद्योजकांचा डोळा आहे. त्यामुळे हे बिल आणले आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत म्हटले की, वक्फ सुधारणा विधेयकसबद्दल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना खासदारांनी एक बैठक झाली. आमच्यात विधेयकावरुन काही संदिग्धता नाही. पण काही गोष्टी ह्या मिडीयासमोर सांगायच्या नसतात, त्या सभागृहात करायच्या असतात. देवेंद्र फडणवीसांना हिंदुत्वाची जर एवढी काळजी आहे तर मुंबईमध्ये जैन धर्मीयांकडून हिंदुंना जागा नाकारली जात आहे. मुंबईत हिंदुंना जागा नाकारत आहे. एखादे बिल आणून त्यांच्यावर कारवाई होणार का? मी मराठी माणूस नाही हिंदू म्हणत आहे. कारण ते नॉनव्हेज खातात म्हणून त्यांना जागा दिली जात नाही. हा अत्यंत गंभीर विषय आहे, त्यावर जर एखादे बिल आणणार असतील तर आम्ही त्याला पाठिंबा देऊ.
संजय राऊत म्हटले की, भाजपने औरंगजेबाची कबर तोडण्याची जी भूमिका घेतली त्यावरुन संघाने विरोध केला, अशी भूमिका घेण्याची गरज नाही असे म्हटले आहे. या बिलाबद्दल संघाची भूमिका ही तशीच असल्याची माझी माहिती आहे. त्यामुळे हिंदुत्व आणि या बिलाचा काही संबंध नाही. हे केवळ बिल आहे.
संजय राऊत म्हटले की,बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाला सुधारणा आणि विज्ञानवाद यांचा एक सपोर्ट दिला आहे. पण फडणवीस आणि त्यांचे बगलबच्चे जी बांग देत आहे ती चुकीची आहे. हिंदुंत्व हिंदुंत्वाच्या जागी आहे, तर अशी बिले त्यांच्या जागी. आम्ही 370 बिलाला, तिहेरी तलाकला विरोध केला नाही.
संजय राऊत म्हणाले की, आमच्या पक्षाची भूमिका ठरली आहे. सदनात गेल्यानंतर तुम्हाला आमची भूमिका दिसेल. आमच्या पक्षप्रमुखांनी जो आदेश दिला, तो आमच्या खासदारांपर्यंत पोहोचला आहे. आमच्या पक्षात अगोदर बाळासाहेब ठाकरे आणि आता उद्धव ठाकरे देतात, तो आदेश अंतिम असतो. त्याचे आम्ही पालन करतो. त्यामुळे आमची भूमिका माध्यमात नाही, तर सदनात दिसून येईल.