पुणे-सुट्ट्यांचा हंगाम सुरु झाला की, नागरिकांना मूळ गावी जाण्याचे किंवा नातेवाईकांना भेटण्यासाठी अथवा पर्यटनाला जाण्याचे वेध लागतात. ह्या काळात रेल्वेला असलेली गर्दी, प्रतीक्षा यादी बघता सामान्य नागरिक हा खासगी प्रवासी बसद्वारे प्रवासाला प्राधान्य देतो.मात्र ,नेमकी प्रवाश्यांची ही गरज ओळखून खासगी बस मालक प्रचंड भाडेवाढ करतात आणि ग्राहकांची पिळवणूक करतात. आज ऑनलाईन बुकिंगसाठी वेबसाईट तपासली असता पुणे ते हैद्राबाद, इंदूर, बैंगलोर,नागपूर यासह विविध ठिकाणी प्रवासाला जाण्याचे आजचे दर आवाक्यातील आणि हजार बाराशे असे असल्याचे दिसून येते. तर सुट्टीच्या काळात मे महिन्याचे दर हे दुप्पट तिप्पट असल्याचे दिसून येते. त्यामुळे खासगी बस चालकांकडून प्रवाश्यांची होणारी लूटमार थांबविण्याची मागणी राज्य परिवहन मंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आल्याची माहिती राज्य भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी येथे दिली आहे.
खर्डेकर म्हणाले,प्रादेशिक परिवहन अधिकारी याप्रकरणाकडे सोयीस्कररित्या डोळेझाक करतात आणि सर्वज्ञात कारणांनी ह्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यास धजावत नाहीत. नागरिक अथवा स्वयंसेवी संस्थांनी थोडा आरडाओरडा केला तर जुजबी कारवाई करताना आरटीओ विभाग दिसतात. मात्र कडक कारवाई करून याला आळा घालण्याचा आर.टी.ओ.चा कोणताही मानस दिसून येत नाही.
ही परिस्थिती पाहता सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने परिवहन मंत्री यांनी त्वरित प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना योग्य सूचना द्याव्यात तसेच वेळप्रसंगी स्वतः खासगी बस मालक चालकांची बैठक घेऊन त्यांना ह्या पिळवणुकीबाबत जाब विचारावा अशी आग्रही मागणी करण्यात आली ह्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पहिले जाईल आणि केवळ पुणेकरांनाच नव्हे तर राज्यातील नागरिकांना दिलासा दिला जाईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.