पुणे-कर्नाटकातून पुणे शहरात दुचाकीवर येऊन वारजे माळवाडी परिसरात घरफोडी करुन पसार झालेल्या कर्नाटकातील आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. व्यंकटेश रमेश व्यंकी (वय २२, रा. गांधीनगर, चल्लाकेरे, जि. चित्रदुर्ग, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून दुचाकी, तसेच कटावणी, कटर, पाना असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी व्यंकटेश व्यंकी हा मूळचा कर्नाटक राज्यातील रहिवासी आहे. तो कर्नाटक मधून पुण्यात दुचाकीवर येऊन घरफोडीचे गुन्हे करत आणि परत जात असल्याची माहिती वारजे माळवाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर चित्ते आणि गणेश शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने कर्वेनगर भागात आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचला. पोलिसांच्या जाळ्यात व्यंकी आल्यावर त्याला सापळा लावून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची दुचाकी जप्त करून दुचाकीची डिकी तपासणी केली.त्यामध्ये डिकीत कटर, कटावणी, पाना, स्क्रु ड्रायव्हर मिळून आला आहे. पोलिसांनी व्यंकी याची सखोल चौकशी केल्यावर चौकशीत त्याने लोणीकंद, आंबेगाव, बावधन परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याची माहिती दिली आहे. त्याच्याकडे असलेली दुचाकी त्याने हडपसर भागातून चोरल्याचे उघड झाले आहे.
परिमंडळ तीनचे पाेलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, उपनिरीक्षक संजय नरळे, पोलीस कर्मचारी वाकसे, कळंबे, चित्ते, शिंदे, पोळ, कुंभार, काटे, तांगडे, कपाटे, जाधव, शेलार यांनी ही कामगिरी केली आहे.

