मुंबई-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या कथित आक्षेपार्ह टिप्पणीनंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा वादात सापडला आहे. एका विडंबनात्मक गाण्यातून टीका केल्यानंतर त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर, कुणाल सोशल मीडियावर सतत सक्रिय आहे आणि एकामागून एक पोस्ट करत आहे. आज देखील त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने ‘लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करावी’ याबाबत लिहिले आहे.
कुणाल कामराचे नेमके ट्विट काय?
कुणालने आज मंगळवारी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ‘लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करावी?’ असे कॅप्शन कुणालने आपल्या पोस्टला दिले आहे. तर पोस्टमध्ये ‘एखाद्या कलाकाराला कसे मारायचे याबद्दल काही सूचना’ असे लिहित काही मुद्दे लिहिले आहेत.
संताप अशा पद्धतीने आणि इतका प्रचंड व्यक्त करायचा की तो अनेक ब्रांड्सना काम करताना अडचण झाली पाहिजे.
त्यानंतर संताप आणि निषेधाचं प्रमाण आणखी वाढवायचं जेणेकरुन संस्थात्मक किंवा व्यक्तीगत कार्यक्रम करण्याआधी कलाकाराला दहादा विचार करावा लागेल.
संतापाचं आणि निषेधाचं, आरडा ओरडा करण्याचं प्रमाण इतकं वाढवा की मोठी हॉटेल्स, स्टुडिओ तुमचा कार्यक्रम घेण्याची रिस्क घ्यायला नको.
संतापाला आता हिंसेचे रुप द्या, म्हणजे छोट्या छोट्या जागा, स्टुडिओ हेदेखील दहशतीने त्यांची दारे बंद करतील.
स्टँड अप कॉमेडीसाठी उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांना समन्स पाठवा, असे केल्याने कलाकाराचा मंच हा एखादा क्राईम सीन होऊन जाईल.
हे सगळे केले की कलाकाराकडे फक्त दोन पर्याय उरतात.
पहिला पर्याय म्हणजे स्वत:चा आत्मा विकायचा आणि त्यांच्या हातचे बाहुले व्हायचे किंवा दुसरा पर्याय शांत बसायचे. मी सांगतोय हे एखादे प्लेबुक नाही. तर राजकीय हत्यार आहे. ज्यामुळे कलाकाराची लोकशाही पद्धतीने पद्धतशीर हत्या करता येते.

