मुंबई-श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी जन्म झालेल्या नवजात बालिकांच्या सर्वांगीण विकासासाठी श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्याचा प्रस्ताव शासन मान्यतेवर सादर करण्याबाबतची घोषणा अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
राज्यातील मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे, त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे, मुलीना सक्षम बनवण्यास प्रयत्न करणे या उद्देशांना हातभार लागावा यासाठी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरतर्फे नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्मास आलेल्या बालिकांच्या नावाने 10 हजार रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट स्वरूपात त्यांच्या आईच्या बँक खात्यावर ठेवण्याबाबतची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. या योजनेला न्यास व्यवस्थापन समितीकडून या अभिनव योजनेला मंजूरी देण्यात आली आहे. तसेच शासनाच्या मान्यतेनंतर योजनेसाठीचे निकष जाहीर कारणयात येतील, अशी माहिती सिद्धिविनायक ट्रस्टकडून देण्यात आली आहे.श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबवण्यात येत असून याला न्यास या व्यवस्थापन समितीने यास मान्यता दिली आहे.
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या विश्वस्त समितीची बैठक 31 मार्च रोजी संस्थेचे अध्यक्ष सदानंद सरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाचा सन 2024-25 चे वार्षिक विवरणपत्र तसेच सन 2025-26 चे अर्थसंकल्पिय अंदाजपत्रक या बैठकीत सादर करण्यात आले. 2024-25 या वर्षात न्यासाचे उत्पन्न 114 कोटी इतके अपेक्षित होते ते विक्रमी 133 कोटींच्या घरात गेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही जवळपास 15 टक्के वाढ आहे. आता पुढील उत्पन्न हे 154 कोटी इतके गृहीत धरण्यात आले आहे.

