पुणे -अनैतिक संबधास बाधा आणणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने ठार मारले पण अवघ्या ३ तासांमध्ये पोलिसांनी हा खुनाचा गंभीर गुन्हा उघडकीस आणुन या दोघांना अटक केली आहे.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’दि.०१/०४/२०२५ रोजी नियंत्रण कक्ष पुणे शहर यांचे मार्फत रायवाडी रोड, वडाळे वस्ती, लोणी काळभोर, पुणे याठिकाणी एक इसम जखमी व बेशुध्द अवस्थेत पडला असलेबाबत कॉल प्राप्त झाला. सदर कॉल चे पुर्ततेकामी लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र पन्हाळे हे पोलीस स्टाफसह तात्काळ घटनास्थळी रवाना झाले. सदर घटनास्थळी इसम नामे रविंद्र काशीनाथ काळभोर वय ४५ वर्षे रा. रायवाडी रोड, वडाळे वस्ती, लोणी काळभोर हा त्याचे राहते घराचे बाहेर पलंगावर रक्ताचे थारोळ्यात जखमी व बेशुध्द अवस्थेत पडला असल्याचे पोलीसांना दिसुन आले. तदनंतर लोणी काळभोर पोलीसांनी लागलीच आय कार, डॉग स्कॉड व अॅम्ब्युलन्स ला पाचारण केले व अॅम्ब्युलन्सव्दारे जखमी इसमास प्राथमिक आरोग्यकेंद्र लोणी काळभोर पुणे येथे नेले. परंतु सदर इसम उपचारापुर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. त्यावरुन सदर इसमाचा कोणीतरी अज्ञात कारणावरुन खुन केल्याची प्राथमिक माहिती पोलीसांना प्राप्त झाली.
तदनंतर पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, राजकुमार शिंदे, व सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर, अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणी काळभोर पो. स्टे. राजेद्र पन्हाळे यांचे मार्गदर्शनाखाली, तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने सदर ठिकाणचे आजबाजुचे परिसरातील लोकांकडे परिस्थीतीजन्य पुराव्यांचे आधारे चौकशी करुन माहिती घेतली. त्यावर मयत इसमाची पत्नी यांचे इसम नामे गोरख त्र्यंबक काळभोर वय ४१ वर्षे यांचेशी अनैतीक संबध असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरुन लोणी काळभोर पोलीसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेवुन त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता, चौकशी दरम्यान गोरख त्र्यंबक काळभोर व मयताची पत्नी या दोघांनी आपसांत संगणमत करुन त्यांचे संबंधात मयत इसम बाधा निर्माण करत असल्याने, मयत इसम हा दि. ३१/०३/२०२५ रोजी रात्री ११/०० वा. चे नंतर त्याचे राहते घराचे बाहेर झोपला असताना त्याचे डोक्यात कोणत्यातरी हत्याराने वार करुन, गंभिर जखमी करुन, त्यास जिवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले आहे.

