श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीरामनवमी उत्सवात प्रख्यात गायिका मंजिरी आलेगावकर यांचे सुश्राव्य गायन ; उत्सवाचे २६४ वे वर्ष
पुणे : संत एकनाथांची रचना असलेले आणि राम फाटक यांच्या संगीताने नटलेल्या ‘राम नाम ज्याचे मुखी’ या अभंग सादरीकरणाने प्रख्यात गायिका मंजिरी आलेगावकर यांनी पुणेकरांची मने जिंकली. पेशवेकालीन तुळशीबाग मंदिरात सुरु असलेल्या २६४ व्या श्रीरामनवमी उत्सवात या स्वर मैफलीतून रामनामाचा महिमा उलगडला.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रख्यात गायिका मंजिरी आलेगावकर यांनी सुश्राव्य गायन सादर केले. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे.
स्वर मैफलीचा प्रारंभ यमन रागातील बंदिशीने झाला. त्यानंतर हंसध्वनी रागातील सादरीकरणाने उपस्थित रसिक राम रंगात रंगून गेले. संत चोखामेळा यांच्या ‘आम्हा न कळे ज्ञान’ या अभंग सादरीकरणाला विशेष दाद मिळाली. तर, जोहार मायबाप जोहार या अभंगाला उपस्थितांनी टाळ्यांनी साथ दिली. कबीरांच्या भजनाने मैफलीचा समारोप झाला.
विशाल मोरे (तबला) सौरव दांडेकर (हार्मोनियम) यांसह कीर्ती कुमठेकर, प्राची गोडबोले, स्वराली आलेगावकर यांनी साथसंगत केली. बुधवार, दि. २ एप्रिल रोजी वृषाली मावळंकर यांचे गायन आणि शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी सानिया कुलकर्णी यांची गायनसेवा होणार आहे. हे कार्यक्रम रात्री ८.३० वाजता होणार असून सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे.

