मुंबई- मी तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील रहिवासी आहे. गेल्या 10 वर्षांपासून मी जेथे राहत नाही अशा पत्त्यावर म्हणजे माहिमला राहणाऱ्या आपल्या नातलगांच्या घरी जाणे म्हणजे सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे,अशी बोचरी टीका कॉमेडियन कुणाल कामराने केल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी मुंबईत आपल्या आई-वडिलांकडे चौकशी केल्याचं समजताच कुणाल कामरा याने एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने म्हटलं आहे की ज्या घरात मी १० वर्षांपासून राहत नाही, तिथे जाऊन पोलिसांनी चौकशी केली.या सगळ्यासाठी पोलीस त्यांचा वेळ व यंत्रणा वाया घालवत आहेत.
कॉमेडियन कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी एका विडंबनात्मक गाण्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. या गाण्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. यानंतर कुणाल कामरावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. याचदरम्यान, पोलिसांनी कुणाल कामराला दोनदा समन्स बजावले. मात्र, कुणाल एकदाही पोलिसांसमोर हजर झाला नाही. त्यामुळे आज पोलिस चौकशीसाठी कुणाल कामराच्या घरी गेले होते. मात्र, त्यांच्या हाती काही लागले नाही. यानंतर कुणालने पोलिसांना उद्देशून एक सोशल मीडिया पोस्ट केली.कुणाल कामराने विडंबनात्मक गाण्यातून एकनाथ शिंदेंवर टीका केल्यानंतर मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामराच्या स्टुडिओची देखील तोडफोड केली होती. यावेळी कुणाल कामराविरोधात दोन गुन्हे दाखल झाले होते. खार पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावले होते परंतु, तो पोलिसांसमोर हजर झाला नाही.
दोन वेळा समन्स देऊनही कुणाल कामरा पोलिसांसमोर हजर न झाल्यामुळे आज अखेर खार पोलिसांचे एक पथक त्याच्या माहीम येथील घरी पोहोचले. त्याच्या घरच्यांनी तो घरी नसल्याचे कळवल्यानंतर पोलिसांना आल्या पावली परत जावे लागले. या पार्श्वभूमीवर कुणाल कामराने पोलिसांना उद्देशून एक सूचक ट्वीट केले आहे. गेल्या 10 वर्षांपासून मी जेथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणे म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे, असे कुणालने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोस्टमध्ये त्याने स्वत: एक फोटो देखील टाकला आहे.पोलिसांनी दोनवेळा समन्स बजावूनही कुणाला कामरा चौकशीसाठी हजर झाला नाही. आता कामरा हजर झाला नाही तर त्याला पोलिसांच्या वतीने तिसरे समन्स पाठवण्यात येण्याची शक्यता आहे. सध्या माहिम पोलिसांची एक टीम कामरा यांच्या घरासमोर तैनात करण्यात आली आहे.
दरम्यान, कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाकडून 7 एप्रिलपर्यंत अटकपूर्व जामीन मिळाला आहे. मी तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील रहिवासी आहे. जर मी मुंबईत परत गेलो, तर मुंबई पोलिस मला अटक करतील. त्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याचा धोका आहे, असे त्याने आपल्या याचिकेत म्हटले होते.
कामराचे स्वागत आमच्या स्टाईलने करू – राहुल कनाल
कायद्याच्या प्रक्रियेचे पालन करून युवा सेनेचे सदस्य दर सोमवार आणि गुरुवारी पोलीस ठाण्यात हजेरीसाठी येतात. तसेच न्यायालयाने कुणाल कामराला दिलासा दिला आहे.न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. मात्र, तो दिलासा 7 एप्रिलपर्यंत आहे. कुणाल कामराने कायदेशीर प्रक्रियेला सामोर जावं. कुणाल कामराला तामिळनाडूमध्ये कितीही संरक्षण असले, तरी जेव्हा मुंबईत येईल तेव्हा शिवसेना स्टाईलने स्वागत करू, ही धमकी नाही, तर आपल्याकडे अथिती देवो भवची संस्कृती आहे, असे शिंदे गटाचे नेते राहुल कनाल यांनी म्हटले आहे.

