श्री रामजी संस्थान तुळशीबाग तर्फे श्रीमत् रामायण प्रवचन
पुणे : प्रभू श्रीराम यांचा आदर्श अवतार आहे. श्रीराम चरित्र हे आचरण्याकरिता आणि भगवान श्रीकृष्ण चरित्रातून बोध घ्यायला हवा. रामायण हे प्रमाण असून तो आद्यग्रंथ आहे. आजच्या काळात रामायणाची महती मोठी असून रामायण हा जीवनग्रंथ असल्याचे मत ज्येष्ठ प्रवचनकार डॉ. कल्याणी नामजोशी यांनी व्यक्त केले.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात श्रीरामनवमी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त भरत तुळशीबागवाले, विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता. श्रीरामनवमी उत्सवाचे अखंडीत २६४ वे वर्ष साजरे होत आहे. यानिमित्ताने डॉ. नामजोशी यांचे श्रीमत् रामायणावर प्रवचन सुरु आहे.
डॉ. कल्याणी नामजोशी म्हणाल्या, सनातन धर्म हा अक्षय असून अनादी काळापासून चालत आलेला आहे. यापूर्वी आपण हिंदू म्हणून मर्यादित केले होते. आता हिंदू आहोत यावर मर्यादित न राहता, सनातन हिंदू धर्म असे म्हटले जाते. हिंदू धर्म हा वेदाधिष्टीत आहे. प्रभू श्रीरामांचे चरित्र आदर्शवत असून जीवन व्यवहारात उपयुक्त असे आहे.
भरत तुळशीबागवाले म्हणाले, मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी दीप्ती कुलकर्णी यांचा सोलो हार्मोनियम वादन कार्यक्रम, बुधवार, दि. २ एप्रिल रोजी वृषाली मावळंकर यांचे गायन आणि शुक्रवार, दि. ४ एप्रिल रोजी सानिया कुलकर्णी यांची गायनसेवा होणार आहे. हे कार्यक्रम रात्री ८.३० वाजता होणार असून सर्व कार्यक्रम विनामूल्य आहेत. तरी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी व्हावे.

