अजित पवारांनी यावरून धडा घ्यावा: शरद पवार गटाचा टोमणा
मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अद्याप आली नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. आमच्यासह संपूर्ण देश 2029 चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहतो. त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकाऱ्यावर आत्तातच चर्चा करणे योग्य ठरणार नाही. वडील जिवंत असताना मुलांनी असा विचार करावा ही भारतीय नव्हे तर मुघलांची संस्कृती आहे, असे ते म्हणालेत.दरम्यान यावरून शरद पवार गटाच्या नेत्यांनी तातडीने यावर ,’ अजित पवारांनी ‘वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही’ या फडणवीस यांच्या विधानाचा अर्थ समजून घ्यावा असे टोमणे मारायला सुरुवात केली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर निशाणा साधत ते आपला राजीनामा देण्यासाठी संघ मुख्यालयात गेल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानमुळे राजकारणात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील टीका केली आहे.देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोदीजी आमचे नेते आहेत. ते अजून बरेच वर्षे काम करणार आहेत. त्यांच्याकडे आमच्या सर्वांचा आग्रह आहे. आमच्यासह संपूर्ण देश त्यांच्याकडे 2029 चे पंतप्रधान म्हणून पाहतो. त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही. तो विचार करायचाही नसतो. वडील जिवंत असताना मुले असा विचार करतात ही मुघलांची संस्कृती आहे. त्यामुळे आत्ता कुणाचाही व कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली नाही किंवा तसा प्रश्नही उपस्थित होत नाही. माझा त्याच्याशी काही संबंधही नाही.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असल्यामुळे ती अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे. याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, या प्रकरणी सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. सदर कबर एएसआय संरक्षित आहे. त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडण्याचा किंवा न आवडण्याचा प्रश्न नाही. या कबरीला कायद्याने 50-60 वर्षांपूर्वी संरक्षण मिळाले आहे. त्यामु्ळे या प्रकरणी कायद्याने तिचे संरक्षण करणे आमची जबाबदारी आहे. पण हे मात्र निश्चित आहे की, कुठल्याही परिस्थितीत आम्ही औरंगजेबाच्या कबरीने ग्लोरिफिकेशन अर्थात उदात्तीकरण होऊ देणार नाही.
नव्या शिक्षण पद्धतीवरून सोनिया गांधींवर निशाणा
सोनिया गांधी यांनी एका लेखाद्वारे शिक्षणाचे जातीयीकरण होत असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही निशाणा साधला आहे. फडणवीस याविषयी बोलताना म्हणाले की, माझ्या मते शिक्षणाचे जातीयीकरण नव्हे तर भारतीयीकरण होत आहे. इंग्रजांनी ज्या शिक्षणाचे ‘मॅकेलेकरण’ केले. आपल्या देशाला गुलाम बनवण्यासाठी मॅकेलेचे पत्र आहे. जोपर्यंत आपण येथील शिक्षण पद्धती बदलणार नाही, तोपर्यंत आपण भारतावर राज्य करू शकत नाही, असे तो म्हणाला होता.
याचा अर्थ जी शिक्षण पद्धती तेव्हा आली होती, ती भारतीयांना गुलाम बनवण्यासाठी आली होती. त्या शिक्षण पद्धतीत बदल करून तिचे भारतीयीकरण केले जात असेल तर त्याचे कुणालाही दुःख होऊ नये. कुणीही राष्ट्रभक्त व्यक्ती असेल तो शिक्षण पद्धतीचे भारतीयीकरण व्हावे असेच म्हणाले. सोनिया गांधींनी याची संपूर्ण माहिती घ्यावी व भारतीयीकरणाला पूर्णपणे पाठिंबा द्यावा, असे ते म्हणाले.
कुंभमेळ्यावरील भाविकांना स्वच्छ पाण्याचा अनुभव देणार
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाराष्ट्रातील नद्या स्वच्छ करण्यावर आपला भर असल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, निश्चितपणे महाराष्ट्रातील नद्या या निर्मळ झाल्या पाहिजेत. त्या अविरल झाल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे. या प्रकरणी सरकारने एक मिशन हाती घेतले आहे. पण हे काही लगेच होणारे काम नाही. कारण, सर्वच महापालिका, नगरपालिका व ग्राम पंचायतीच्या सांडपाण्याची प्रक्रिया करावी लागेल. तसेच उद्योगांच्याही पाण्याचे प्रक्रिया करावी लागेल. वेगवेगळ्या नाल्यांचे पाणी ट्रॅप करून त्यावर प्रक्रिया करावी लागते.
हा खूप मोठा कार्यक्रम आहे. थोडा वेळ खाणारा व काहीसा खर्चिक कार्यक्रम आहे, पण तो केलाच पाहिजे असे आमचे मत आहे. त्याची सुरुवात झाली आहे. मला विश्वास आहे की, जेव्हा कुंभमेळा होईल व लोक पवित्र गोदावरीत स्नानाला येतील, त्यावेळी त्यांना स्वच्छ पाण्याचा अनुभव कसा देता येईल असा आमचा प्रयत्न असेल, असे फडणवीस म्हणाले.
जनतेला स्वस्त वीज देणार
फडणवीस म्हणाले, राज्यातील विजेचे दर 10 टक्क्यांनी कमी होत आहे. मी विधानसभेतही हे सांगितले होते. विजेचे दर पुढच्या 5 वर्षांत दरवर्षी टप्प्याटप्याने कमी करण्यात येणार आहेत. त्यानुसार आमची जी याचिका आहे, ती नियामक मंडळाने स्वीकारली आहे. ती स्वीकारताना काही मुद्यांवर आमचे मतभेद आहेत. हे मतभेद दूर झाले तर लोकांना स्वस्त वीज मिळेल. याविषयी आपली जी कंपनी ही कंपनीही जी 70-80 कोटींच्या डेब्टमध्ये आहे, ती देखील डेब्टफ्री करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी यावेळी बीडमध्ये शांतता असल्याचे सांगत शांतता भंग करणाऱ्यांवर एकसमान कारवाई करण्याचीही ग्वाही दिली. तसेच मशिदींवरील भोंग्याच्या मुद्यावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचेही आश्वासन दिले.

