नवी दिल्ली – भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे.आता राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चार नावं चर्चेत आहेत ती म्हणजे शिवराज सिंग चौहान, भुपेंद्र यादव , मनोहरलाल खट्टर आणि धर्मेंद्र प्रधान ही चार नावं भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. ६ एप्रिलला भाजपाचा स्थापना दिवस आहे. त्यामुळे या दिवशी नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशातल्या एका नेत्याचं म्हणणं आहे की जिल्हा पातळीवरच्या निवडणुका होणं बाकी आहेत. त्या राज्यात सुरु झाल्या की भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला वेग येईल. विविध कारणं समोर येत आहेत. मात्र भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड का लांबते आहे याचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाईल अशाही चर्चा रंगल्या होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपण महाराष्ट्रातच राहणार असं सांगितलं होतं. दरम्यान निवडणुकीत भाजपासह महायुतीला २३७ जागा मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत. साधारण वर्षभरापूर्वी विनोद तावडेंचंही नाव चर्चेत होतं. दरम्यान आता नवे चार चेहरे चर्चेत आहेत. त्यापैकी कुणाला राष्ट्रीय अध्यक्षपद मिळणार की भाजपा धक्कातंत्राचा वापर करुन अनेपक्षित नाव समोर आणणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

