‘
सांगीतिक मैफल व जन्मशताब्दी स्मृतिजागर
पुणे : ग्रंथाली वाचनप्रसार आणि संस्कृतिकारण करणारी संस्था सर्वदूर मराठी मुलाखत प्रसिद्ध आहे. 1974मध्ये आरंभ करत ग्रंथालीने अनेक साहित्यात्रा योजल्या. ग्रंथयात्रा, ग्रंथमोहोळ, ग्रंथएल्गार, बहुजन साहित्य यात्रा, विपुल ग्रंथयात्रा, विजय तेंडुलकर संवादयात्रा…. यातील बर्याच यात्रांची सांगता पुण्यात झाली. या वाटचालीत अनेक जण सहभागी होत गेले. नवविचारांची, नवलेखकांची पुस्तकं ग्रंथालीने प्रसिद्ध केली. बहुजनांच्या दुःखाचा हुंकार त्यात होता. विविध विषय नव्याने पुढे येत होते, नवे लेखक घडत होते. त्याचवेळी ग्रंथाली सामाजिक-सांस्कृतिक भान राखत जगण्याच्या सर्वांगांना भिडणार्या कलांचेही व्यासपीठ झाली.
गेल्या वर्षी 4 एप्रिल रोजी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या ग्रंथालीने डिजिटल माध्यमातही आपली वाट चोखाळली आहे. विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
नुकताच विलेपार्ले येथे जयवंत दळवी, गंगाधर गाडगीळ आणि विद्याधर पुंडलीक यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या साहित्याचा स्मृतिजागर घडवला.
सुवर्ण महोत्सवाची सांगता करतानाही, शुक्रवार, 4 एप्रिल ते रविवार 6 एप्रिल 2025, असे तीन दिवस ग्रंथालीने भव्य संगीत आणि साहित्योत्सव योजला आहे. तो संवाद, पुणे, महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने व पुणे महानगरपालिकेच्या सहकार्याने होईल.
यामध्ये 4 एप्रिल रोजी, बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत सांगीतिक मैफल रंगणार आहेत. नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित, विदुषी अश्विनी भिडे-देशपांडे आणि भुवनेश कोमकली यांच्या गायनाने सांगता समारंभाची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर लाइव्ह पोर्ट्रेट रेखाटन करणार आहेत.
जयवंत दळवी आणि गंगाधर गाडगीळ यांचे साहित्य आणि व्यक्तित्व उलगडणारे कार्यक्रम शनिवार, 5 तारखेला ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे दुपारी 3 ते रात्री 9 या वेळेत होईल. तर रविवारी, 6 तारखेला सकाळी 10.30 ते 1 या वेळेत विद्याधर पुंडलीक यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम होईल. रामदास भटकळ, कुमार केतकर यांच्या मार्गदर्शनात आखलेल्या या कार्यक्रमाच्या संहिता राजीव नाईक व मोनिका गजेंद्रगडकर यांनी लिहिल्या आहेत. प्रत्येक साहित्यिकावर निर्मित लघुचित्रफीत त्यांचे जीवन व कार्य सांगेल. त्याचे लेखन संपादन राजीव जोशी यांनी केले आहे. यामध्ये अभिवाचन, पुस्तिका प्रकाशन, नाट्यप्रवेश असेल. मराठी रंगभूमी, सिनेमा-मालिकांतील ख्यातनाम कलावंत या साहित्याच्या आविष्कार आपल्या वाचिक अभिनयातून चित्रदर्शी साकार करतील. चंद्रकांत काळे, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, प्रमोद पवार, स्वाती चिटणीस, शैलेश दातार, प्राजक्त देशमुख, ऐश्वर्या नारकर, रजनी वेलणकर, मधुरा वेलणकर-साटम, पुष्कर श्रोत्री, अनिता दाते, अभिजित खांडकेकर, गौतमी देशपांडे, पूर्वा पवार, मोहित वैद्य, विशाख म्हामणकर आणि मोनिका गजेंद्रगडकर असे कलावंत यात सहभागी होत आहेत.
याचबरोबर या दोन्ही कार्यक्रमांत ग्रंथालीच्या 50 वर्षांतील उपक्रम व कार्यक्रमांचा आढावा ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, डॉ. मृण्मयी भजक मांडतील. तसेच ग्रंथप्रदर्शन व सवलतीत विक्री होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. पुढील काही रांगा राखीव असतील. 4 तारखेच्या कार्यक्रमासाठी प्रवेशिका मिळण्यासाठी सुनील महाजन 9371010432 (संवाद, पुणे) आणि 5 व 6 तारखेच्या प्रवेशिकांसाठी राजेश देशमुख 8698580739 (सचिव, महाराष्ट्र कल्चरल सेंटर) आणि दोन्ही कार्यक्रमांसाठी आर्या करंगुटकर 9004949656 व धनश्री धारप 9223466860 या क्रमांकांवर संपर्क साधावा. प्रवेशिक दोन्ही थिएटरवर 1 एप्रिल 2025 पासून उपलब्ध असतील, असे ग्रंथालीच्या कार्यक्रम संयोजक धनश्री धारप कळवतात.
पुण्यात संगीत आणि साहित्योत्सवाने होणार ग्रंथाली’च्या सुवर्ण महोत्सवाची सांगता
Date: