जनसेवा न्यास, हडपसर आणि अमनोरा येस्स फाऊंडेशनतर्फे गुढीपाडव्यानिमित्त महिलांची भव्य रॅली
पुणे : जनसेवा न्यास, हडपसरतर्फे अमनोरा येस्स फाऊंडेशनच्या सहकार्याने गुढीपाडव्यानिमित्त रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या हिंदू महिला महोत्सवात सहभागी झालेल्या हडपसर परिसरातील सुमारे पाच हजार जलज्योतींनी येत्या वर्षभरात 100 कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प केला. रॅलीत सहभागी झालेली प्रत्येक महिला एका कुटुंबाला पाण्याच्या बचतीसाठी उद्युक्त करणार आहे.
हडपसर परिसरातील माळवाडी, वैदुवाडी, रामटेकडी, ससाणे नगर, गोंधळे नगर/सातववाडी, फुरसुंगी/भेकराई नगर, बी. टी. कवडे रोड, मगरपट्टा, अमनोरा, शेवाळवाडी, मुंढवा/मांजरी, कुमार पिकासो, उंड्री/पिसोळी, व्हिनस वर्ल्ड स्कूल, अमरसृष्टी तसेच अमनोरामधील महिलांची अस्पायर टॉवर्स आणि अवंतिकांची मेट्रो टॉवर्स समोरून अशा एकूण 17 ठिकाणांहून सायंकाळी महिलांच्या दुचाकी रॅलीला सुरुवात झाली. नऊवारी साडी या पारंपरिक वेशभूषेत महिला मराठमोळा फेटा बांधून रॅलीत सहभागी झाल्या होत्या. दुचाकी रॅलीची सांगता अमनोरा क्रिकेट ग्राउंड, एड्रिनो टॉवर समोर, अमनोरा, हडपसर येथे झाली. प्रयागराज येथील जलकलशाचे पूजन करून 100 कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प करण्यात आला. समारोपस्थळी दुचाकीद्वारे आलेल्या महिलांचे ढोल-ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले.
अमनोरा येस्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, राष्ट्र सेविका समितीच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य चंदाताई साठे, प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, जनसेवा न्यासाचे कार्यकारी विश्वस्त माधव राऊत, विश्वस्त भूषण तुपे, सी. ई. ओ. चेतन कुलकर्णी, अमनोरा येस्स फाऊंडेशनचे विवेक कुलकर्णी, प्रविण पाताळे, महेश करपे यांची मंचावर प्रमुख उपस्थित होती. कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून झाली. या वेळी जलज्योती संकल्पनेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पाणी बचतीसंदर्भात जनजागृतीला येत्या काही दिवसात सुरुवात होणार असून या गणेशोत्सवापासून पुढील गणेशोत्सवापर्यंत 100 कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प पूर्ण केला जाणार असल्याचे अमनोरा येस्स फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे यांनी प्रास्ताविकात सांगितले. ते पुढे म्हणाले, देशात महिला शक्ती मोठ्या प्रमाणात कार्यरत असून त्यांनी कुटुंबातील प्रत्येकाला पाणी बचतीचे महत्त्व पटवून देत त्याची साखळी निर्माण केल्यास 100 कोटी लिटर पाणी बचतीचा संकल्प नक्कीच पूर्णत्वास जाईल.
प्रार्थना बेहेरे म्हणाल्या, आज उपस्थित नारीशक्तीचे दर्शन अत्यंत सकारात्मक असून प्रत्येक स्त्रीने आपल्या कुटुंबाला पाणी बचतीचे महत्त्व पटवून देत जागरुकता निर्माण करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय संपत्तीचा ऱ्हास थांबविणे या संकल्पनेतून साकार झालेला हा उपक्रम अभिनंदनीय आहे.
चंदाताई साठे म्हणाल्या, मराठी नवीन वर्षाची सुरुवात पाणी बचतीच्या संकल्पाने होत आहे, ही आनंददायक बाब आहे. आज उपस्थित असलेल्या महिला शक्तीच्या बळावर ही संकल्पना नक्कीच पूर्णत्वास जाईल, असा विश्वास वाटतो. वसुधैव कुटुंबकम् आणि सर्वे भवन्तु सुखिन: या संस्कृतीची जपणूक भारतीय हिंदू परंपरा करत आहे. ही संस्कृती पुढील पिढीपर्यंत प्रवाहित ठेवण्यासाठी आजच्या पिढीने तार्किक, ऐतिकहासिक, शास्त्रियदृष्ट्या सखोल अभ्यास करून त्यांच्यापर्यंत हिंदू संस्कृतीचे महत्व पोहोचविणे आवश्यक आहे. प्रत्येक महिलेला आई-बहिण मानण्याची हिंदू संस्कृती घराघरात प्रस्थापित होणे आजच्या काळाची गरज आहे.