हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त आयोजन ; विविध चित्ररथांचा सहभाग
पुणे : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर रथ…वंदे मातरम या काव्याला १५० वर्ष पूर्ण झाली त्याबद्दल माहितीपूर्ण रथ…पर्यावरणचे भान राखून प्रबोधनपर पाणी या विषयावर जनजागृती रथ यांसह छत्रपती शिवाजी महाराज रथ अशा एकापाठोपाठ एक आलेल्या चित्ररथांचा सहभाग आणि पारंपरिक वेशात सहभागी पुणेकरांनी शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रेत सहभागी होत मातृशक्तीला नमन केले.
गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी शोभायात्रेला प्रारंभ झाला. यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, रा.स्व.संघ मोतीबाग नगर संघचालक अॅड. शरद चंद्रचूड, समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर व सहसंयोजक अश्विन देवळणकर यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे डॉ. मेधा कुलकर्णी यांसह निवेदिता एकबोटे, गायत्री खडके, पुणे शहर भाजपा महिला उपाध्यक्ष हर्षदा फरांदे, प्राची वाईकर, दीप्ती शिदोरे, सीमा गोवंडे यांच्या हस्ते ग्राम गुढी उभारण्यात आली. यात्रा प्रमुख म्हणून अथर्व दातार व चैतन्य कुसूरकर यांनी नियोजन केले.
ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँड, मर्दानी खेळ, वेत्रचर्म पथक देखील सहभागी झाले होते. याशिवाय सो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे यांचा रथ, मराठी अभिजात भाषा रथ यांसह अनेक विशेष रथ देखील शोभायात्रेत सहभागी झाले. तुळशीबाग मंडळ, नवनीत मित्र मंडळ, कडबे आळी तालीम मंडळ, अखिल शनिवार पेठ नवरात्र उत्सव समिती, कालिका माता देवस्थान समिती, चिमण्या गणपती मंडळ यांनी देखील सहभाग घेतला.
याशिवाय विविध भजनी मंडळे, अध्यात्मिक समूह, सनातन धर्माभिमानी मंडळी, प्रभू राम-लक्ष्मण-सीता हनुमान यांच्या मूर्ती, पारंपरिक वेषभूषा आणि ऐतिहासिक, अध्यात्मिक, स्वातंत्र्यलढ्यातील थोर व्यक्ती इत्यादींचा आदर्श ठेवून केलेल्या वेशभूषेतील नागरिक मोठ्या संख्येत शोभायात्रेत होते. लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सुरु झालेली शोभायात्रा तुळशीबाग राममंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर पर्यंत काढण्यात आली.

