कनेक्टिंग ट्रस्ट’च्या द्विदशकपूर्तीनिमित्त ‘लिसनिंग टू द व्हाईसेस ऑफ वुमेन’वर आयोजित परिसंवादामध्ये उमटला सूर
पुणे, ता. ३०: “भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रिया बहुतेकवेळा अवास्तव अपेक्षा आणि स्वतःविषयीचा अपराधी भाव घेऊन जगतात. त्यामुळे त्या मुक्त संवादापासून वंचित राहतात. सतत दडपण, दबाव यामुळे त्यांचे म्हणणे ऐकून घेणारे कुणीच नाही, या भावनेचा ताण असह्य होऊन अनेक स्त्रिया आत्मघातकी विचारांपर्यंत पोचतात,” असे निरीक्षण मान्यवर वक्त्यांनी परिसंवादात नोंदवले.
काही प्रसंगाने निराश, दुःखी किंवा आत्मघातकी विचारांचा प्रभाव असल्यास, त्यापासून परावृत्त करण्याचे महत्त्वाचे सामाजिक कार्य करणाऱ्या ‘कनेक्टिंग ट्रस्ट’च्या द्विदशकपूर्तीनिमित्त (२० वर्षे) ‘लिसनिंग टू द व्हाईसेस ऑफ वुमेन’ या विशेष परिसंवादाचे आयोजन केले होते. एकेएस फाऊंडेशनच्या संस्थापक बरखा बजाज, ‘माहेर’ संस्थेच्या संस्थापक सिस्टर ल्यूसी कुरियन, विधिज्ञ संध्या देशपांडे, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या कादंबरी शेख व वरिष्ठ संपादक कोरिना मॅन्यूअल यांनी विचार मांडले. समाजशास्त्र अभ्यासक डॉ. मेघा देऊसकर यांनी परिसंवादाचे संचलन केले.
यावेळी कनेक्टिंग ट्रस्टच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अर्नवाज दमानिया उपस्थित होत्या. थरमॅक्स लिमिटेडच्या अध्यक्ष मेहेर पदमजी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. परिसंवादापूर्वी मुसकान संस्थेच्या कीर्ती, स्त्री मुक्ती संघटनेच्या स्वप्नाली यांनी मनोगत व्यक्त केले. फरिदा आणि सुहासिनी यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला.
कादंबरी शेख यांनी ‘ट्रान्सजेंडर व्यक्तींचे भावविश्व अधिक गुंतागुंतीचे असते. सर्वप्रथम कुटुंबच त्यांना नाकारते, मग समाज नाकारतो आणि विशिष्ट जीवनशैली अनुसरायला भाग पाडतो. माझ्याही वाट्याला अनेक भीषण अनुभव आले. पण मी प्रयत्नपूर्वक सगळे सोसून बाहेर पडले. द्विपदवीधर झाले. मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करते. पण समाजाचा, कुटुंबाचा दबाव मर्यादा आणतो’, असे मत मांडले.
सिस्टर ल्यूसी यांनी तळागाळातील स्त्रियांच्या दडपणाचे चित्र उदाहरणासह मांडले. ‘निरक्षर, अर्धशिक्षित स्त्रियांचे प्रश्न अधिक गंभीर आहेत. त्यांच्या वाट्याला हतबलता, असहायता अधिक येते’, असे त्या म्हणाल्या. संध्या देशपांडे यांनी वकील म्हणून काम करताना कौटुंबिक स्तरावरचे विदारक वास्तव सोदाहरण सांगितले. ‘दडपल्या गेलेल्या स्त्रियांना बोलण्याच्या अवस्थेत आणणे, हेच मोठे आव्हान असते’, असे त्या म्हणाल्या.
बरखा बजाज यांनी नातेसंबंधांचा ताण आणि दडपण स्त्रियांवर अधिक प्रतिकूल परिणाम करते. संकोच, लाज, भीती, लोक काय म्हणतील, या भावनेचे दडपण स्त्रिया अधिक बाळगतात, असे मत मांडले. कोरिना मॅन्युअल यांनी आपण सदैव एकमेकींसाठी आहोत, हा विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे मत मांडले. गायत्री दातार यांनी सूत्रसंचालन केले.
अर्नवाझ दमानिया यांनी ट्रस्टचे सर्व सहकारी आणि पदाधिकारी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. स्त्रीपण हा एक आव्हानात्मक प्रवास असतो, असे सांगून ट्रस्टचे काम २० वर्षे सुरू ठेवण्यात सहकाऱ्यांचे परिश्रम, सातत्य, निष्ठा आणि समाजाप्रती सहसंवेदना मोलाची ठरत असल्याचे त्या म्हणाल्या.
समाज स्त्रीचे ऐकतो, तेव्हा तिचे कर्तृत्व आभाळभर होते : मेहेर पदमजी
शतकानुशतके स्त्रियांचा आवाज दाबला गेला आहे. विशेषतः मोकळेपणाने बोलू न शकल्याने दडपण असह्य होऊन आत्महत्येला प्रवृत्त होणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण भारतात अधिक आहे. त्यामुळे स्त्रियांना मोकळेपणाने बोलता येणे, संवादासाठी त्यांना त्यांचा अवकाश मिळणे, गरजेचे आहे. समाज जेव्हा स्त्रीचे ऐकतो, तेव्हा तिचे कर्तृत्व आभाळभर होते, असे प्रतिपादन थरमक्स लिमिटेडच्या अध्यक्ष मेहेर पदमजी यांनी केले. ऐकणे आणि ऐकून घेणे, ही जगण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे. कनेक्टिंग ट्रस्टच्या माध्यमातून स्त्रियांचे असे अ-बोलणे समजून घेण्याचा अवकाश मिळतो, त्या मोकळ्या होत जातात, हे महत्त्वाचे आहे, असे मेहेर पदमजी यांनी सांगितले.